मद्यपींमुळे तीन वर्षांत ४१ हजार अपघात - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 06:21 AM2020-03-20T06:21:22+5:302020-03-20T06:21:53+5:30
२०१६-१८ या वर्षांत ४० हजार ९८३ अपघात झाले आहेत. गिरीधारी यादव आणि रमा देवी यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला गडकरी यांनी उत्तर दिले.
नवी दिल्ली : २०१६ ते २०१८ या कालावधीत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांमुळे ४१ हजार अपघात झाल्याची माहिती रस्ते, परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली. २०१६-१८ या वर्षांत ४० हजार ९८३ अपघात झाले आहेत. गिरीधारी यादव आणि रमा देवी यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला गडकरी यांनी उत्तर दिले.
२०१६ मध्ये १४ हजार ८९४, २०१७ मध्ये १४ हाजर ७१ आणि २०१८ मध्ये १२ हजार १८ अपघात झाल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. मोटर वाहन कायद्यानुसार मद्यपान करून वाहन चालवल्यास तुरुंगवास आणि दंड अशा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. मंत्रालयाकडून सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोंदिया-डोंगरगड रेल्वे सुरू करा!
छत्तीसगडमध्ये डोंगरगड येथे बम्लेश्वरी हे प्रमुक धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नाही तर मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधूनही मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मात्र, गोंदिया ते डोंगरगड दरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीत रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो. अनेक वर्षांपासून
या मार्गावर रेल्वे सुविधा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी नुकतीच लोकसभेत केली.
नगरमध्ये स्वदेश,प्रसाद योजना सुरू करा!
अहमदनगरला सांस्कृतिक वारसा असून शिर्डीतील साईबाबा मंदिर, नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर, शनी शिंगणापूर, दत्त मंदिर, भगवानगड अशा धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्य संग्रामातही अहमदर नगर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अहमदनगरमध्ये स्वदेश आणि प्रसाद योजना सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.
लडाखमधील गुंतवणूक वाढीसाठी काय करणार?
बाहेरील लोकांना लडाखमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. मात्र, स्थानिक नागरिक जमीन विकण्यास तयार नाहीत. जमीन खरेदी केल्याशिवाय लडाखमध्ये गुंतवणूक करणे अशक्य आहे. त्यामुळे येथील गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्याची माहिती द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.