उत्तर भारतात थंडीच्या लाटेचे ४२ बळी; काही भागांत पारा शून्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 03:35 AM2019-12-29T03:35:59+5:302019-12-29T06:35:21+5:30
मराठवाडा, विदर्भात गारांचा पाऊस पडण्याची शक्यता
नवी दिल्ली/लखनऊ/मुंबई : नाताळ संपून नववर्षाकडे वाटचाल सुरू असताना उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर, मध्य प्रदेश, पंजाब या सर्व राज्यांमध्ये थंडीची लाट पसरली असून, आतापर्यंत या थंडीने गारठून उत्तर प्रदेशमध्ये ४२ जण मरण पावले आहेत. त्यापैकी दोन जण दिल्लीनजीकच्या नॉयडा येथील आहेत. जम्मूमध्ये दोन व हरयाणातही एक जण थंडीमुळे मरण पावला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर १ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या पर्वतीय भागांत सतत होणारी बर्फवृष्टी आणि थंड वारे यांमुळे अवघा उत्तर भारत तीन दिवसांपासून पार गारठून गेला आहे. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले असून, अनेक राज्यांमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी आठ वाजता उघडणारी दुकाने १0 वाजल्यानंतर सुरू होतात. सरकारी कार्यालयांमध्येही उपस्थिती कमी असते. चहाच्या टपऱ्यांपाशी लोकांची गर्दी होत आहे. तसेच संध्याकाळी सर्वत्र शेकोट्या पेटवल्या जात आहेत.
राजस्थानातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा शून्याखाली आला आहे. पिलानीमध्ये उणे 0.५ इतके तापमान नोंदविले गेले. फतेपूरमध्ये तापमान उणे ३ होते. दिल्लीच्या काही भागांतही शनिवारी सकाळी तापमान १ ते २ अंश सेल्सिअसच्या आसपास होते. रस्त्यांवर राहणाºया लोकांनी निवारागृहांकडे धाव घेतली आहे.
काश्मीरमध्येही थंडीचा कहर असून, श्रीनगरमधील दाल लेक गोठून गेला आहे. लेहमध्ये तापमान उणे १८ अंश इतके होते. पहलगाममध्ये उणे १२.७ तर गुलमर्गमध्ये उणे ११.२ अंश तापमानाची नोंद झाली.
उत्तराखंडमधील आठ शहरांमध्येही तापमान २ अंशांखाली आहे. चमोलीमधील जोशीमठ आणि कुमाऊं च्या मुक्तेश्वर येथे ते शून्याखाली गेले आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा, मंडी, सोलन, सिरमौर व उना येथेही थंडीची लाट आहे.
राज्यातही कडाका
मुंबई : कडाक्याच्या थंडीने शनिवारी महाराष्ट्र गारठला. सर्वात कमी तापमान नागपूर येथे ५.१ अंश होते. विदर्भातील बहुतांश शहरांचे किमान तापमान १० अंशांखाली आहे. नाशिकच्या निफाडमध्ये तापमान ८ अंश होते. मुंबईत मात्र थंडी कमी आहे.
ईशान्येकडेही गारठा
मध्य प्रदेश व पंजाबच्या काही भागांमध्ये तापमान २ ते उणे १ च्या दरम्यान आहे. अमृतसर व जालंधरमध्ये थंडीचा इतका कहर आहे की, रस्त्यांवर शुकशुकाट आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा तसेच ईशान्येकडील सिक्कीम तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम आदी राज्यांतही कडाक्याची थंडी जाणवत आहे.