पीएम किसान निधीचे ४२ लाख अपात्र लाभार्थी; महाराष्ट्रात ४.४५ लाख अपात्र लोकांकडून ३५८ कोटी रुपयांची वसुली होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 08:53 AM2021-07-21T08:53:53+5:302021-07-21T08:56:25+5:30
योजनेत महाराष्ट्रातील १.१४ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.
नितीन अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान सन्मान निधीचा लाभ देशात ४२.१६ लाख अपात्र शेतकऱ्यांनी घेतला असून, त्यांच्याकडून सरकार २९,९२७ कोटी रुपये वसूल करणार आहे. महाराष्ट्रात असे ४,४५,४९७ जण अपात्र असून, ते सरकारचे ३५८ कोटी रुपये देणे लागतात. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अनुदान योजनेचा लाभ एकूण ४२,१६,६४३ अपात्रांनाही दिला गेला. त्यांच्याकडून २९,९२७ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली जाणार आहे. यात सर्वात जास्त शेतकरी आसाम (८.३५ लाख), तामिळनाडू (७.२२ लाख), पंजाब (५.६२ लाख) आणि महाराष्ट्रातील (४.४५ लाख) आहेत.
सुजय पाटील, हिना गावित, श्रीकांत शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील इतर काही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना तोमर यांनी ही माहिती दिली. योजनेत महाराष्ट्रातील १.१४ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यात १.१० कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले गेले. लाभार्थी शेतकऱ्यांना सरासरी सहापेक्षा जास्त हप्त्यांत सरासरी १२,५४५ रुपये मिळाले. नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची नावे राज्य सरकारे करतात.
कोणत्या जिल्ह्यातून किती शेतकरी?
अहमनगर (६.८६ लाख), सोलापूर (६.२० लाख), कोल्हापूर (५.४७ लाख), सातारा (५.२९ लाख ) आणि पुण्यातील (५.१४ लाख) सर्वाधिक शेतकरी योजनेचे लाभार्थी होते. ठाणे (१.१९ लाख), नंदूरबार (१.२८ लाख), पालघर (१.३१ लाख), रायगड (१.५२ लाख), गडचिरोली (१.५२ लाख) आणि सिंधुदुर्गच्या (१.५४ लाख) शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.