भाजपा मुख्यालयातील 42 जणांना कोरोनाची लागण; आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 07:53 AM2022-01-12T07:53:58+5:302022-01-12T07:54:27+5:30
BJP headquarters : सध्या निवडणूक रॅलींवर बंदी आहे, पण संसर्ग झपाट्याने पसरत आहे. यातच आता भाजपा मुख्यालयातही या धोकादायक व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले.
नवी दिल्ली : भाजपा मुख्यालयात कोरोनाचा स्फोट झाला आहे. मुख्यालयातील एकूण 42 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका होणार होत्या. त्यामुळे भाजपाकडून सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. आता चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर जवळपास 42 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
गेल्या काही दिवसांत भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींपर्यंत अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या निवडणूक रॅलींवर बंदी आहे, पण संसर्ग झपाट्याने पसरत आहे. यातच आता भाजपा मुख्यालयातही या धोकादायक व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. भाजपा मुख्यालयात संक्रमित व्यक्तींमध्ये सुरक्षा कर्मचारी व अन्य कर्मचारी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या संदर्भात भाजपाकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. भाजपा आता आपल्या निवडणूक बैठका कधी आणि कोणत्या पद्धतीने घेणार याबाबतही स्पष्टता नाही. रॅलींवर आधीच बंदी आहे, अनेक नेत्यांना कोरोना लागण झाली आहे, अशा स्थितीत निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आगामी काळात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा यासह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
दुसरीकडे, महाराष्ट्रातही मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्र सरकारमधील आतापर्यंत 15 मंत्री आणि जवळपास 70 आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. दिल्लीतही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोना संसर्ग झाला होता. अशा परिस्थितीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने राजकीय पक्षांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ केली आहे.