काश्मीरमध्ये महिनाभरात ४२ जण मारले गेले
By admin | Published: June 25, 2017 12:56 AM2017-06-25T00:56:40+5:302017-06-25T00:56:40+5:30
रमझानचा महिना हा मुस्लिमांमध्ये अतिशय पवित्र मानला जातो. मात्र याच महिन्यात काश्मीर खोऱ्यात ९ पोलिसांसह ४२ जण मारले गेले.
श्रीनगर : रमझानचा महिना हा मुस्लिमांमध्ये अतिशय पवित्र मानला जातो. मात्र याच महिन्यात काश्मीर खोऱ्यात ९ पोलिसांसह ४२ जण मारले गेले. गोळीबार व हिंसाचारात मरण पावलेल्या ४२ जणांत २७ दहशतवादी आणि ६ नागरिक आहेत. श्रीनगरचे पोलीस उपअधीक्षक मोहम्मद आयुब पंडित यांनाही जमावाने ठेचून मारले.
पंडित यांना ज्या प्रकारे मारण्यात आले, त्यामुळे पोलीस संतापले आहेत. सरकार नीट स्थिती हाताळत नाही आणि बळी आम्हाला पडावे लागते, अशी तक्रार पोलीस करीत आहेत. पंडित यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आज तीन जणांना अटक केल्याने एकूण पाच जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. पोलीस आणखी आठ जणांचा शोध घेत आहेत.
हा प्रकार घडला, तेव्हा हुरियत कॉन्फरन्सचा नेता मीरवाइज फारूख मशिदीत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जेकेएलएफचा नेता यासिन मलिक याला पोलिसांनी जम्मूतून अटक करून श्रीनगरला नेले.
फुटीरवादी नेते चिथावणीखोर भाषा करून तणाव वाढवत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाईच्या सूचना मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी द्यायला हव्यात. कारवाईसाठी त्या पुढाकार घेत नाहीत, असे पोलिसांना वाटते. पंडित यांच्या हत्येनंतर श्रीनगरचे पोलीस अधीक्षक सज्जाद खालिक भट्ट यांची बदली झाली. त्यांच्यावर कारवाई होते, पण चिथावणीखोर नेत्यांवर कारवाई होत नाही, अशी तक्रार आहे.
फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था बंद करावी, अशी मागणी होत आहे. राज्याचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी तसे सूचितच केले आहे. हुरियत कॉन्फरन्सचा नेता मीरवाइज उमर फारुख याची सुरक्षा काढून घ्यायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. तसे प्रत्यक्षात होणार का, राज्य सरकार तो निर्णय घेणार का, हा प्रश्न आहे.
सततच्या हिंसाचार व तणावामुळे काश्मीरमधील पर्यटन व्यवसायही डबघाईला आला आहे. पर्यटनावर अवलंबून असलेले व्यापारी व उद्योजक तसेच हॉटेलमालक, गाइड, छोटे दुकानदार आणि टूर्स व ट्रॅव्हल्सवाले या प्रकारामुळे अडचणीत आले आहेत. आमच्या रोजगारावरच आता गदा आली आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर आम्हाला अन्यत्र जावे लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे. एरवीही पर्यटनावर अवलंबून असलेले अनेक दुकानदार आता अन्य राज्यांमध्ये व्यवसायासाठी निघून गेले आहेत.