धक्कादायक वास्तव! "42 हजार शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची तर 15,000 शाळांमध्ये शौचालयाची नाही सोय"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 12:45 PM2021-03-19T12:45:01+5:302021-03-19T12:52:31+5:30
Government Schools in India : तब्बल 42 हजारांपेक्षा जास्त सरकारी शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची तसेच 15 हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये शौचालये नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
नवी दिल्ली - देशातील तब्बल 42 हजारांपेक्षा जास्त सरकारी शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची तसेच 15 हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये शौचालये नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. एकात्मिक जिल्हा माहिती प्रणाली शिक्षण आकडेवारीच्या आधारे त्यांनी ही माहिती दिली आहे.
रमेश पोखरियाल निशंक यांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, 2018-19 मध्ये देशातील 10 लाख 41 हजार 327 सरकारी शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. तर 10 लाख 68 हजार 726 शाळांमध्ये शौचालये आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सरकारी शाळांसह सर्व शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि सर्व मुलांसाठी सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे अशा सूचना वारंवार दिल्या असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, 42 हजार 74 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यापैकी सर्वाधिक 8 हजार 522 शाळा आसाममधील आहेत. तर आंध्र प्रदेशात 3771, बिहारमध्ये 4270, जम्मू-काश्मीरमध्ये 2158, मध्यप्रदेशमध्ये 5529, झारखंडमध्ये 1840, मेघालयात 5208, राजस्थानमध्ये 2627, उत्तर प्रदेशात 3368 आणि पश्चिम बंगालमध्ये 1520 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही.
मुलांसाठी पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा नसल्याच्या बाबतीतही आसाम पहिल्या क्रमांकावर आहे. आसाममधील 13,503 शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. तसेच बिहारमध्ये 9471, जम्मू-काश्मीरमध्ये 1379, कर्नाटकात 1519, मध्य प्रदेशात5975, मेघालयात 1933, ओडिशामध्ये 2484, राजस्थानमधील 1061 आणि पश्चिम बंगालमध्ये 2142 शाळांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.