पंजाबमध्ये ४२४ व्हीआयपींची सुरक्षा काढली; भगवंत मान यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 10:51 AM2022-05-29T10:51:05+5:302022-05-29T10:51:10+5:30
मान सरकारने जेव्हा त्यांच्या सुरक्षेतील अर्धे कर्मचारी परत बोलावले होते.
चंडीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील आणखी ४२४ व्हीआयपींच्या सुरक्षेत कपात केली आहे. यात श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांचा समावेश आहे. सुरक्षेतून काढून
घेतलेले सर्व गनमॅन पंजाब सशस्त्र पोलिसचे कमांडो आहेत. त्यांना जालंधर छावणीतील सशस्त्र पोलीस दलात समाविष्ट करण्यात येणार
आहे.
श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (एसजीपीसी) पाहणार आहे. मान सरकारने जेव्हा त्यांच्या सुरक्षेतील अर्धे कर्मचारी परत बोलावले होते, तेव्हा त्यांनी उर्वरित अर्धे कर्मचारीही परत केले होते. एसजीपीसीने त्यांच्या तलवंडी साबो येथील निवासस्थानाबाहेर चार सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. एसजीपीसीचे सचिव तेजिंदर सिंह यांनी सांगितले की, जत्थेदार सुरक्षेसाठी कोणत्याही सरकारवर अवलंबून नाहीत.
मान सरकारने यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष शमशेर सिंह दूलो, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा व माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंह ढिंडसा यांच्या सुरक्षेत कपात केली आहे.
दरबार साहिबचे मुख्य ग्रंथी ज्ञानी जगतार सिंह, डेरा मुखी बाबा सुखदेव सिंह, डेरा सचखंड बल्लांचे मुखी निरंजन दस, भैणी साहिबचे मुखी सतगुरू उदय सिंह व पंजाबचे शाही इमाम मौलाना मुहम्मद उस्मान लुधियानवी यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. याबरोबरच पंजाब पोलिसांतील अनेक एडीजीपी, आयजी, डीआयजी व डीसीपी यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे.