भारतीय तरुणाची फसवणूक; पाठवायचे होते अमेरिकेत पण सोडले सर्बियाच्या जंगलात, नेमकं काय घडलं..?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 12:23 PM2022-05-04T12:23:25+5:302022-05-04T12:24:25+5:30
हरयाणातील एका तरुणाची 43 लाख रुपयांची फसवणूक झाली असून, गेल्या एका महिन्यापासून तो बेपत्ता आहे.
चंदीगड : भारतीय तरुणांना नेहमीच परदेशाची ओढ राहिली आहे. नोकरी करुन पैसे कमवण्यासाठी भारतीय विदेशात जातात. पण, विदेशात जाण्यासाठी चुकीचा मार्ग निवडला तर मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अशाच प्रकारची एक घटना हरयाणातील एका तरुणासोबत घडली आहे.
विदेशात पाठवण्यासाठी हरयाणातील युवक जश्नप्रीत (१९) याच्याकडून ४३ लाख रुपये घेतले, पण त्याला अमेरिकेऐवजी सर्बियाच्या घणदाट जंगलांत सोडून देण्यात आले. गेल्या एक महिन्यापासून त्याचा काहीच पत्ता नाही. जश्नप्रीतच्या कुटुंबीयांनी करनालच्या पोलीस अधीक्षकांकडे याबाबत लेखी तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले की, “अमेरिकेत पाठवण्यासाठी ४५ लाख रुपये मागण्यात आले होते. ४३ लाख रुपयांत पाठवण्याचे ठरले. पैसे उभे करण्यासाठी आम्हाला दोन एकर जमीन विकावी लागली.”
करनाल जिल्ह्यातील निसिंग पोलीस ठाण्यात एजंट बलबीर सिंग याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांची पोलीस चौकशी करीत आहेत. पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. जश्नप्रीत त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक आहे. दोन एकर जमीन विकल्यानंतर आता या कुटुंबाकडे उदरनिर्वाहासाठी एकच एकर जमीन राहिली आहे.
३१ मार्चला झाले शेवटचे बोलणे
जश्नप्रीतची आई राजविंदर कौर यांनी सांगितले की, “३१ मार्च रोजी माझे जश्नप्रीतशी शेवटचे बोलणे झाले होते. एजंटने आम्हाला खात्री दिली की, जश्नप्रीतला कायदेशीर मार्गांनी अमेरिकेतून आणले जाईल. आधी त्याला दुबईला नेण्यात आले. मग सर्बियातून जंगलातील रस्त्याने नेण्यात येत असताना जश्नप्रीतने आक्षेप घेतल्यावर त्याला मारहाण करून तेथेच जंगलात सोडून दिले गेले.”