‘गिनीज’साठी भारतीय जवानाची माेहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 05:33 AM2021-04-04T05:33:36+5:302021-04-04T05:34:35+5:30
वेलू हे नर्सिंग साहाय्यक असून श्रीनगरच्या ६० पॅरा फिल्ड रुग्णालयात तैनात आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांनी केवळ १७ दिवसांमध्ये १६०० किलाेमीटरचे अंतर पार केले हाेते.
जम्मू : भारतीय सैन्यातील एक जवान जरा वेगळ्याच माेहिमेवर निघाला आहे. लष्करातील मॅराथाॅनपटू नायक वेलू पी तब्बल ४३०० किलाेमीटर अंतर धावून पार करणार आहेत. ही माेहीम ५० दिवसांच्या पार पाडून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये त्यांच्या नावाची नाेंद हाेणार आहे.
वेलू हे नर्सिंग साहाय्यक असून श्रीनगरच्या ६० पॅरा फिल्ड रुग्णालयात तैनात आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांनी केवळ १७ दिवसांमध्ये १६०० किलाेमीटरचे अंतर पार केले हाेते. असा पराक्रम करणारे ते पहिले भारतीय ठरले हाेते. याची आशियाई विक्रम म्हणून नाेंद घेण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आता जागतिक विक्रमावर त्यांचे लक्ष्य आहे. श्रीनगर येथून ते कन्याकुमारीला जाण्यासाठी निघाले आहेत. हे ४३०० किलाेमीटरचे अंतर ५० दिवसांच्या आत पार पाडून गिनिज बुकमध्ये नाव नाेंदविण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
यासाठी ते दरराेज ७० ते १०० किलाेमीटर धावणार आहेत. देशातील प्रमुख शहरे आणि राज्यांमधून वेलू यांचा प्रवास राहणार आहे. ऐन उन्हाळ्यात त्यांनी ही माेहीम आखल्यामुळे वाढत्या तापमानाचेही त्यांच्यासमाेर माेठे आव्हान राहणार आहे.