महाराष्ट्रातील ४४ जुनी स्थानके चकाकणार! देशातील ५०८ स्थानकांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 08:31 AM2023-08-05T08:31:36+5:302023-08-05T08:32:02+5:30
रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा एकाच वेळी प्रारंभ करीत असताना संबंधित लोकसभा मतदारसंघातील खासदार व केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या भागांतील रेल्वेस्थानकांवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संजय शर्मा -
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी देशातील ५०८ जुन्या रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा एकाच वेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रारंभ करणार आहेत. यात महाराष्ट्रातील ४४ जुन्या स्थानकांचा समावेश केला आहे. त्यांचा पुनर्विकास करून तेथे सिटी सेंटर व शॉपिंग मॉल विकसित केला जाणार आहे.
रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा एकाच वेळी प्रारंभ करीत असताना संबंधित लोकसभा मतदारसंघातील खासदार व केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या भागांतील रेल्वेस्थानकांवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकाच वेळी एवढ्या रेल्वेस्थानकांवर हा कार्यक्रम आयोजित करून नवीन रेकॉर्ड केले जात आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनातील कक्षात भेट घेतली. वैष्णव यांनी सांगितले की, ५०८ रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासासाठी २४४७० कोटींची तरतूद केली आहे.
‘अमृत भारत स्थानक’ योजनेंतर्गत देशातील १३०९ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे स्थानकावर शॉपिंग सेंटर, सिटी सेंटर...
- या रेल्वेस्थानकांवर पुनर्विकासांतर्गत शॉपिंग सेंटर, शॉपिंग मॉल्स, सिटी सेंटर उभारण्यात येतील. रेस्टॉरंट, दुकाने, शोरूम, जिम्नॅशियमसुद्धा येथे असतील.
- पुनर्विकासासाठी महाराष्ट्रातील ४४ रेल्वेस्थानकांची निवड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील ५५, राजस्थानमधील ५५, बिहारधील ४९, मध्य प्रदेशातील ३४, आसाममधील ३२, ओडिशामधील २५, पंजाबमधील २२, गुजरातमधील २१, झारखंडमधील २०, आंध्र प्रदेशातील १८, हरयाणातील १५ व कर्नाटकमधील १३ रेल्वेस्थानकांची निवड करण्यात आली आहे.