उद्योगजगताकडून ४.५ लाख कोटी रूपये
By admin | Published: July 2, 2015 03:24 AM2015-07-02T03:24:40+5:302015-07-02T03:24:40+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया प्रकल्पाची आज घोषणा केली असून, भारतीय उद्योगजगतातील अनेक उद्योगपतींनी या चळवळीत आपणही पंतप्रधानांबरोबर
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया प्रकल्पाची आज घोषणा केली असून, भारतीय उद्योगजगतातील अनेक उद्योगपतींनी या चळवळीत आपणही पंतप्रधानांबरोबर असल्याचे आश्वासन दिले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी डिजिटल इंडिया अत्यंत यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतातील युवा पिढी तंत्रज्ञान हाताळणार आहे. डिजिटल इंडियाच्या उभारणीसाठी रिलायन्स २ लाख ५० हजार कोटी रु.ची गुंतवणूक करणार आहे अशी घोषणाही मुकेश अंबानी यांनी केली आहे. रिलायन्स जिओ या इंटरनेट सेवा कंपनीसंदर्भात ही घोषणा करताना मुकेश अंबानी म्हणाले, भारतीय नागरिकांना परवडतील असे स्मार्टफोन व उपकरणे रिलायन्स जिओकडून तयार केली जातील.
बिर्ला कंपनीचे ७ अब्ज डॉलर
येत्या ५ वर्षांत पायाभूत योजना परस्परांना जोडण्यासाठी आदित्य बिर्ला कंपनी ७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करील अशी घोषणा आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम यांनी केली. आदित्य बिर्ला कंपनीतर्फे मोबाईल वॅलेटही तयार केले जाणार आहेत. याच प्रमाणे वेदांत ग्रुपचे अनिल अग्रवाल यांनी कंपनीतर्फे येत्या ५ वर्षांत १०० हजार कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली. ४ जी सर्वसाामन्य नागरिकापर्यंत नेऊ असे त्यांनी सांगितले. टाटा समूह आयटी क्षेत्रात १९८५पासून सक्रिय. टीसीएस यावर्षी ६० हजार कर्मचाऱ्यांची भरती करीत कामाचा विस्तार करणार. आदित्य बिर्ला समूहाची आयडिया सेल्युलर या कंपनीने आतापर्यंत १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. येत्या काही वर्षांत ७ अब्ज डॉलर गुंतवणुकीची योजना. भारती एन्टरप्रायझेस ही सुनील भारती यांची कंपनी ४ जी सोबत ई- हेल्थ आणि ई-शिक्षण योजनेत मोठी गुंतवणूक करीत आहे. अनिल अग्रवाल यांचा वेदांता समूह देशातील सर्वात मोठा आॅप्टिकल फायबर निर्माता आहे. इलेक्ट्रॉनिक फॅब एलसीडीच्या निर्मितीत ४० हजार कोटींची गुंतवणूक करणार. ५० हजार लोकांना रोजगार.हरीओम राय यांच्या लाव्हा इंटरनॅशनलने एक लाख लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अझीम प्रेमजी यांचा विप्रो समूह सरकारच्या मिशनमध्ये गुंतवणूक वाढविणार.पवन मुंजाल यांचा हिरो मोटोकॉर्प आता नव्या क्षेत्रात उतरत इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करणार. मिकिओ कायायामा यांचा नायडेक कॉर्पोरेशन येत्या १० वर्षांत १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार. २५ हजार लोकांना रोजगार.
टाटा ग्रुप : डिजिटल इंडियातील टाटा ग्रुपच्या सहभागाबद्दल बोलताना टाटा ग्रुपचे अध्यक्ष सायरस मिस्त्री म्हणाले, डिजिटल इंडिया या योजनेसाठी आधी भारत सरकारचे अभिनंदन, टाटा समूह यात संपूर्णपणे सहभागी होईल. टाटा ग्रुपची कंपनी टीसीएस सरकारच्या पासपोर्ट सेवा व इतर योजनांत आधीपासून सहभागी असून दुर्गम भागापर्यंत या योजना पोहोचवण्याचे काम करीत आहे.