देशात ४५ लाख टन साखर उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 01:05 PM2019-12-19T13:05:39+5:302019-12-19T13:13:30+5:30
राज्यात अवघे साडेसात लाख टन साखरेचे उत्पादन
पुणे : देशातील ४०६ साखर कारखाने १५ डिसेंबर अखेरीस सुरू झाले असून, ४५.८१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात आघाडी घेतली असून, एकूण उत्पादनापैकी जवळपास निम्मे उत्पादन येथे झाले आहे. महाराष्ट्रात अवघे ७.६६ लाख टन साखर उत्पादन झाले असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत ते ३० टक्केच असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली.
यंदाच्या साखर हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३५ टक्के साखर उत्पादन कमी झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात देशभरातील ४७३ साखर कारखान्यांची धुराडी पेटली होती. त्यातून ७०.५४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशातील ११९ साखर कारखान्यांनी २१.२५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्यावर्षी याच काळामध्ये येथील ११६ कारखान्यांनी १८.९४ लाख टन साखर उत्पादित केली होती. यावर्षी २.३१ लाख टन साखर अधिक उत्पादित केली आहे. देशात साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात १५ डिसेंबर अखेरीस ७.६६ लाख टन साखर उत्पादित झाली. गेल्यावर्षी याच काळात राज्यातील १७८ कारखाने सुरू होते. त्यांनी २९ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कर्नाटक राज्यातही १०.६२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ३.३२ लाख टनांनी साखर उत्पादन कमी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उसाला पुराचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गाळप हंगाम १ महिना, तर कर्नाटकातील गाळप हंगाम एका आठवड्याने उशिरा सुरू झाला. पावसामुळे बाधित झालेल्या उसाचा साखर उतारादेखील कमी असल्याने, उत्पादनात घट नोंदविण्यात आली.
गुजरातमध्ये १.५२ लाख टन, आंध्रप्रदेश, तेलंगणामधे ०.३०, तमिळनाडूत ०.७३, बिहार १.३५, पंजाब ०.७५, हरयाणा ०.६५ आणि मध्य प्रदेशमध्ये ०.३५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या राज्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट नोंदविण्यात आली आहे.
........
साखर कारखाने करणार १६३ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा
देशातील साखर कारखाने, डिस्टिलरी युनिट डिसेंबर २०१९ ते नोव्हेबंर २०२० या कालावधीत १६३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करणार आहेत. त्यातील १०.३८ कोटी लिटर इथेनॉल उसाच्या रसापासून आणि ६२.५८ कोटी लिटर बी हेवी मोलॅसिस पासून बनविण्यात येणार आहे. तर, ८६.३९ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती सी हेवी मोलॉॅसिसमधून आणि ३.७८ कोटी लिटर खराब अन्नधान्यातून होणार आहे. म्हणजेच यातील ७३ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती थेट उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसमधून होईल. हे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट आहे.