४५ मिनिटांचा पास, थांबले २ तास, हल्लेखोरांना खासदारांनी बदडले; संसदेच्या सुरक्षेतील मोठ्या त्रुटी उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 11:01 AM2023-12-14T11:01:29+5:302023-12-14T11:01:42+5:30

लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून सुरक्षा भेदण्याचा जो प्रकार बुधवारी झाला त्यात चार नव्हे तर सहाजणांचा समावेश होता, अशी माहिती समोर येत आहे.

45 minute pass, 2 hour wait, attackers replaced by MPs; Major lapses in Parliament's security exposed | ४५ मिनिटांचा पास, थांबले २ तास, हल्लेखोरांना खासदारांनी बदडले; संसदेच्या सुरक्षेतील मोठ्या त्रुटी उघड

४५ मिनिटांचा पास, थांबले २ तास, हल्लेखोरांना खासदारांनी बदडले; संसदेच्या सुरक्षेतील मोठ्या त्रुटी उघड

हरीश गुप्ता/संजय शर्मा 

नवी दिल्ली : लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून सुरक्षा भेदण्याचा जो प्रकार बुधवारी झाला त्यात चार नव्हे तर सहाजणांचा समावेश होता, अशी माहिती समोर येत आहे. लोकसभेच्या अभ्यागतांच्या गॅलरीतून उडी मारणारे सागर शर्मा आणि डी. मनोरंजन यांच्याकडे ४५ मिनिटांच्या कालावधीसाठी अभ्यागत पास होते. परंतु ते नियमांचे उल्लंघन करून सुमारे दोन तास प्रेक्षक गॅलरीत थांबले, अशी माहिती समोर येत आहे. तावडीत सापडताच या तरुणांना खासदारांनी चांगलाच चोप दिला.

लोकसभेत बुधवारी झालेल्या प्रकारामुळे सुरक्षा प्रोटोकॉलमधील त्रुटी समोर आल्या आहेत. विशेष संचालक (सुरक्षा) ते सुरक्षा सहाय्यक श्रेणी-२ या पदानुक्रमात सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मंजूर पदांची संख्या ३०१ आहे तर १७६ कार्यरत आहेत आणि १२५ पदे रिक्त आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिक्त पदांमध्ये सर्वांत मोठा वाटा प्रवेशस्तरीय अधिकाऱ्यांचा आहे जे सुरक्षा यंत्रणेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. 

सुरक्षा सहाय्यक श्रेणी-दोन मधील ७२ पदांच्या मंजूर संख्येच्या तुलनेत सध्याची संख्या नऊ आहे. सुरक्षा सहाय्यक श्रेणी-१ अधिकाऱ्यांची सध्याची संख्या २४ आहे. तर मंजूर पदांची संख्या ६९ आहे. १० वर्षांहून अधिक काळापासून नवीन भरती झाली नसल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.  

आम्हीच आरोपींना बदडले : बेनिवाल  

स्मोक स्टिकमधून गॅस व रंग पसरविणारा सागर याला पकडून मारहाण करणारे राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष खा. हनुमान बेनिवाल म्हणाले की, मला वाटले तो पायातून बूट का काढत आहे. त्याच्याकडे बॉम्ब किंवा इतर स्फोटक वस्तू तर नाही? त्याच्या पायाला पकडून नंतर त्याला मारहाण केली. नंतर इतर खासदारांनीही मारहाण केली. 

वेगवेगळी द्वारे का नाहीत : चौधरी

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी नव्या संसदेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अभ्यागत व खासदारांच्या प्रवेशासाठी वेगवेगळी प्रवेशद्वारे का नाहीत, असेही ते म्हणाले. चौधरी यांनी सरकारवर आरोप करताना म्हटले की, आधी गुप्तचर संस्थांनी अलर्ट दिला होता. १३ डिसेंबरच्या संसदेवरील हल्ल्याच्या दिवशी काही तरी होऊ शकते, असा इशारा दिलेला असताना सरकारने कोणतीही जबाबदारीची पावले उचलली नाहीत.

स्पायडरमॅनप्रमाणे तो उतरत होता : अग्रवाल

भाजप खा. राजेंद्र अग्रवाल म्हणाले की, आधी मला वाटले की, कोणी प्रेक्षक गॅलरीतून पडला की काय? परंतु दुसरा स्पायडरमॅनप्रमाणे भिंतीला पकडून प्रेक्षक गॅलरीतून खाली उतरत होता. 

केमिकल अटॅक... : दानिश अली

बसपातून निलंबित करण्यात आलेले खा. दानिश अली म्हणाले की, आरोपी पायाजवळून कोणते शस्त्र काढत आहे की काय, असे वाटत होते. विचित्र गॅस व पिवळ्या रंगाचा धूर दिसला. केमिकल अटॅक झाल्यासारखे वाटले. हे पाहून सर्वांत आधी सागर शर्मा याला पकडले. 

...वाटले तो बूट फेकणार : नागर

बसपा खा. मलूक नागर म्हणाले की, पहिला आरोपी सागर शर्मा खासदारांच्या खुर्ची, टेबलवरून जात असताना पायातील बूट काढत होता. त्यावेळी वाटत होते की, तो खासदार किंवा अध्यक्षांच्या खुर्चीवर बूट फेकतो की काय? हे पाहून सर्व खासदारांनी त्याला पकडले व त्याला मारहाण केली.

हा संघटित हल्ला : अरविंद सावंत

बावीस वर्षांपूर्वी संसद भवनावर अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा ते संसद भवनाच्या आत शिरु शकले नव्हते. आज ते थेट सभागृहातच अवतरले.

सुरक्षेतील ही अतिशय गंभीर चूक आहे. ज्या पद्धतीने सभागृहात आणि संसद भवनाबाहेर एकाच वेळी हा प्रकार सुरु होता आणि एकाच रंगाचा धूर बाहेरही काढला जात होता, ते बघता हे पूर्वनियोजित आणि संघटितपणे करण्यात आलेले आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले. 

संसदेत फोडलेला स्मोक क्रॅकर नेमका काय? 

संसदेत तरुणांनी स्मोक क्रॅकर उडविण्याचा प्रयत्न केला. हा स्मोक क्रॅकर एक फटाका आहे. उत्सवामध्ये या फटाक्याचा वापर करण्यात येतो. तो आणीबाणीच्या स्थितीत सिग्नल देण्यासाठीही उपयोगात आणला जातो. 
स्मोक क्रॅकर अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फटाका खूप हानीकारक नसतो पण त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर  केल्यास स्मोक क्रॅकर धोकादायक ठरू शकतो. तो एखाद्या ग्रेनेडसारखा दिसतो. 
स्मोक क्रॅकर फटाक्याची किंमत ५०० ते २००० रुपये आहे. संसदेत दोन तरुणांनी जो स्मोक क्रॅकर 
आणला होता, त्याच्यातून पिवळा धूर येत होता. 
नौदल, भूदलामध्ये सिग्नल देण्यासाठी स्मोक क्रॅकरचा वापर करतात. साहसी मोहिमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांकडेही स्मोक क्रॅकर असतात.

Web Title: 45 minute pass, 2 hour wait, attackers replaced by MPs; Major lapses in Parliament's security exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Parliamentसंसद