२०५० मध्ये भारतातील ४५ कोटी तरुण लठ्ठ? वाढत्या फास्ट फूडमुळे गंभीर संकट उभे ठाकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 08:48 IST2025-03-06T08:48:00+5:302025-03-06T08:48:14+5:30
चीन, भारत आणि अमेरिका या तीन देशांमध्ये लठ्ठपणाची समस्या सर्वाधिक आहे.

२०५० मध्ये भारतातील ४५ कोटी तरुण लठ्ठ? वाढत्या फास्ट फूडमुळे गंभीर संकट उभे ठाकले
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : फास्ट फूड खाण्याचे वाढते प्रमाण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदय, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणाच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. लठ्ठपणा आणि वाढत्या वजनाची समस्या अशीच वाढत राहिली तर २०५० पर्यंत जगभरातील २५ वर्षांवरील सुमारे ३८० कोटी तरुणांचे वजन जास्त असेल. ही संख्या त्यावेळच्या जगातील तरुणांच्या अंदाजे निम्म्याहून अधिक असेल, असे लॅन्सेट या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन म्हटले आहे.
अहवालानुसार चीन, भारत आणि अमेरिका या तीन देशांमध्ये लठ्ठपणाची समस्या सर्वाधिक आहे. २०५० पर्यंत, भारतातील २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लठ्ठ लोकांची लोकसंख्या सुमारे ४५ कोटींवर पोहोचेल. सध्या ही संख्या १८ कोटींच्या आसपास आहे.
फास्ट फूडच्या सेवनात वाढ
कॅमेरून, व्हिएतनामसह भारतातही फास्ट फूडचा वापर वाढत आहे. या गोष्टी खाणे लठ्ठपणाचे मोठे कारण बनत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
महिलांमध्ये समस्या अधिक
पुरुषांपेक्षा (सुमारे १०० कोटी) महिला (१११ कोटी) अधिक लठ्ठ होत्या. त्यामुळे महिलांना जीवनशैलीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल.