ठाण्यात ४६ जण तडीपार
By admin | Published: October 10, 2014 02:45 AM2014-10-10T02:45:06+5:302014-10-10T02:45:06+5:30
मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहर आणि ग्रामीण परिसरातून ही तडीपारी करण्यात आली. निवडणुकीत कोणीही कायदा व सुव्यवस्था हाती घेऊ नये
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक कारवाईचा एक भाग असलेल्या तडीपार कारवाईत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून आतापर्यंत ४६ जणांना तडीपार करण्यात आले आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहर आणि ग्रामीण परिसरातून ही तडीपारी करण्यात आली. निवडणुकीत कोणीही कायदा व सुव्यवस्था हाती घेऊ नये, तसेच लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी ठाणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांचा सपाटा लावला आहे. जिल्ह्यात १८ मतदारसंघांतील निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेत मुंबई पोलीस अॅक्ट ५५, ५६ आणि ५७ प्रमाणे तडीपारीची कारवाई हाती घेतली. यात गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येते.शहर पोलीस आयुक्तालयातील ३२ पोलीस ठाण्यांतून १४९ जणांविरोधात तडीपार कारवाई करण्याबाबत त्या-त्या परिमंडळ उपायुक्तांकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार, ४६ जणांना तडीपार करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत ४९ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.