निवडणूक रोखे: शिवसेनेच्या सर्वांत मोठ्या देणगीदाराला राज्यात ४,६५२ कोटींच्या घरांचे कंत्राट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 10:26 AM2024-03-23T10:26:47+5:302024-03-23T10:28:01+5:30
पक्षाला सर्वाधिक निधी देणाऱ्यांमध्ये क्विक सप्लाय चेन कंपनीचाही समावेश
मुंबई: निवडणूक रोख्यांद्वारे शिवसेनेला मोठी देणगी देणाऱ्यांमध्ये बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन्स टेक्नॉलॉजी प्रा. लि.चा समावेश आहे. या कंपनीने शिवसेनेला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून ८५ कोटी रुपयांची देणगी दिली होती. गेल्या वर्षी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या कंपनीला महाराष्ट्रात २०४४८ फ्लॅट बांधण्याचे ४,६५२ कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले होते. तसेच क्वीक सप्लाय चेन या कंपनीने शिवसेनेला जानेवारी २०२२ मध्ये २५ कोटी रुपये दिले होते.
बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन्स टेक्नॉलॉजीने खरेदी केलेले निवडणूक रोखे शिवसेनेने अल्पावधीतच ते वटविले. १० जानेवारी २०२४ रोजी या कंपनीने २५ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले होते. त्यानंतर १५ जानेवारी २०२४ रोजी शिवसेनेने हे रोखे वटविले. या कंपनीने जून २०१९ ते २०२२ या वर्षाच्या अखेरीपर्यंत निवडणूक रोखे घेतले नव्हते. त्याआधी मे २०१९ मध्ये त्यांनी आप पक्षाला १ कोटी रुपये व भाजपला ५० लाख रुपये दिले होते. बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन्स टेक्नॉलॉजीने बाकीचे निवडणूक रोखे २०२३-२४ या कालावधीत खरेदी केले आहेत.
शिवसेनेसाठी रोखे खरेदी करणाऱ्या कंपन्यांमध्ये पीआरएल डेव्हलपर्स (५ कोटी रुपये), दिनेशचंद्र अग्रवाल इन्फ्राकॉन (३ कोटी), जेनेक्स्ट हार्डवेअर पार्क्स (३ कोटी), टोरेन्ट पॉवर लिमिटेड (३ कोटी), अल्ट्रा टेक सिमेंट (३ कोटी), युवान ट्रेडिंग कन्सल्टन्सी (३ कोटी), सेंच्युरी टेक्सटाइल्स (१ कोटी), जिंदाल पॉली फिल्म्स (५० लाख), सुला विनयार्ड्स (३० लाख रुपये) यांचा समावेश आहे. शिवसेनेला ज्या बिल्डरांनी देणग्या दिल्या, त्यात के. रहेजा कॉर्पोरेशन (१ कोटी), कीस्टोन रिएल्टर्स (१.३ कोटी), वामोना डेव्हलपर्स (३० लाख रु.) यांचा सहभाग आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाच्या बँक खात्यातून काढल्या मोठ्या रकमा
मुंबई : शिवसेनेमध्ये पडलेली फूट व उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा जून २०२२ मध्ये राजीनामा या घटनेनंतरही जानेवारी २०२४ पर्यंत या पक्षाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मोठ्या देणग्या मिळाल्या होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर देणग्यांसाठीच्या एसबीआय खात्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्यात आले.
रोख्यांची योजना सुरू झाली तेव्हापासून ते जून २०२२पर्यंत शिवसेनेने रोख्यांद्वारे मिळणाऱ्या देणग्यांसाठी स्टेट बँकेत उघडलेल्या बँक खात्यातून काही लाख रुपये ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या रकमा काढल्या होत्या. जानेवारी २०२२मध्ये शिवसेनेने २५ कोटी रुपये बँक खात्यातून काढले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून एकनाथ शिंदे गट-भाजपचे आघाडी सरकार सत्तेवर आले. त्यानंतर शिवसेनेच्या खात्यातून तीन वेळा पैसे काढण्यात आले. ती एकूण रक्कम ९५ कोटी रुपये होती. २५ जुलै २०२३ रोजी ३३ कोटी, १८ ऑक्टोबर २०२३ला ३७ कोटी व १५ जानेवारी २०२४ ला २५ कोटी रुपये एसबीआय बँक खात्यातून शिवसेनेने काढले. २०१८ पासून मिळालेल्या २२७ कोटी रुपयांपैकी ४० टक्के रक्कम शिवसेनेने एसबीआय खात्यातून काढली होती.
शिवसेनेला कोणत्या कंपनीने किती दिले?
- ८५ बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड
- २५ क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड
- ३ पीआरएल डेव्हलपर्स लिमिडेट
- ३ दिनेशचंद्र आर. अग्रवाल इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड
- ३ जेनेक्स्ट हार्डवेअर पार्क्स प्रायव्हेट लिमिटेड
- ३ टोरेंट पॉवर लि.
- ३ अल्ट्राटेक सिमेंट लि.
- ३ युवान ट्रेडिंग कन्सल्टन्सी एलएलपी
- २.५ महालक्ष्मी विद्युत प्रा. लि.
- २ ॲलना सन्स प्रायव्हेट लिमिटेड
- २ बिर्ला इस्टेट्स प्रायव्हेट लि.
- २ फ्रिगोरिफिको अल्लाना पी.
- २ प्ररंभ सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड
- २ रणजित बिल्डकॉन लि.
- १.३ कीस्टोन रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड
- १ अल्लाना कोल्ड स्टोरेज
- १ सेंचुरी टेक्सटाइल्स अँड इंडस्ट्रीज लि.
- १ के. रहेजा कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड
- १ रणजित प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
याशिवाय, मनवर सावभाई ०.५००६, जिंदाल पॉली फिल्म्स लि.०.५, सितारा डायमंड प्रायव्हेट लिमिटेड ०.५, सुला विनयार्ड्स प्रायव्हेट लिमिटेड ०.५, वामोना डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ०.५, मनवर देवाभाई ०.१४३६, देवल खामुभाई मनवर ०.१२६८, भाचीबेन खामुभाई मनवर ०.०७६८, हरिजन हिरीबाई ०.०७६८, राठोड लखीबेन ०.०७६८, प्रेमचंद गोधा ०.०७, सीएच. उदय शंकर ०.०२, सी. व्ही. श्रीनिवास ०.०२, आर. सूर्य नारायणराजू ०.०२, टी. सिरिश बाबू ०.०२
(कंपनी दिलेला निधी कोटींमध्ये)