चंद्राबाबूंचे आॅफिस ४६ व्या मजल्यावर, नव्या राजधानीतील सर्वोच्च जागा मुख्यमंत्र्यांसाठीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:27 PM2018-03-24T23:27:36+5:302018-03-24T23:27:36+5:30
विभाजनानंतर शिल्लक राहिलेल्या आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी म्हणून उभारण्यात येत असलेल्या अमरावतीमध्ये मुख्यमंत्र्यांचे कार्यालय ४६ व्या मजल्यावर असेल. या कार्यालयातील खुर्चीत बसून मुख्यमंत्री संपूर्ण राजधानीचे विहंगम दृश्य पाहू शकतील.
हैदराबाद : विभाजनानंतर शिल्लक राहिलेल्या आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी म्हणून उभारण्यात येत असलेल्या अमरावतीमध्ये मुख्यमंत्र्यांचे कार्यालय ४६ व्या मजल्यावर असेल. या कार्यालयातील खुर्चीत बसून मुख्यमंत्री संपूर्ण राजधानीचे विहंगम दृश्य पाहू शकतील.
मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांच्या स्वप्नातील अमरावतीचे बांधकाम दोन वर्षे युद्धपातळीवर सुरु असले तरी त्यात मुख्यमंत्र्यांचे कार्यालय नेमके कुठे असेल याची उत्सुकता होती. नगरपालिका प्रशासनमंत्री पी.नारायण यांनी शनिवारी ही उत्सुकता दूर केली. ४६ व्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयास जोडून हेलिपॅडही असेल. तेथून व्हीआयपी व परदेशी पाहुणे थेट ‘सीएमओ’मध्ये जाऊ शकतील.
अमरावतीच्या केंद्रस्थानी पाच टोलेजंग इमारतींचे मुख्य प्रशासकीय संकुल असेल. यापैकी मधोमध असणारी इमारत ४६ मजल्यांची तर इतर चार इमारती प्रत्येकी ४० मजल्यांच्या असतील. मंत्री नारायण यांनी सांगितले की, अमरावतीची रचना करणाऱ्या सर नॉर्मन फॉस्टर या जनविख्यात आर्किटेक्टच्या फॉस्टर+पार्टनर्स या फर्मने या पाच मुख्य प्रशासकीय इमारतींचे अंतिम नकाशे सादर केले असून एप्रिलअखेर त्यांचे बांधकाम सुरु होईल. या पाच गननचुंबी इमारतींची मॉडेल आमदारांना पाहण्यासाठी विधानभवनात ठेवण्यात आली
होती. (वृत्तसंस्था)
असे असेल अमरावती शहर
अमरावतीची विभागणी नऊ विभागांमध्ये असेल.
प्रत्येक विभाग त्या उद्देशानुसार अमूक सिटी म्हणून ओळखला जाईल.
यापैकी २१७ चौ. किमीवरील ‘अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सिटी’ सर्वात मोठी असेल. त्यात वर उल्लेखलेल्या केंद्रस्थानच्या पाच टोलेजंग इमारतींखेरीज ८.५ लाख चौ. फूट क्षेत्रावर बांधलेली विधिमंडळाची इमारत असेल.
‘जस्टिस सिटी’च्या मध्यभागी दोन लाख चौ. फुटांचे उच्च न्यायालय असेल.