४८ तास सर्च करून संपवली जीवनयात्रा
By Admin | Published: September 2, 2015 11:34 PM2015-09-02T23:34:46+5:302015-09-03T09:59:48+5:30
आत्महत्या कशी करावी आणि आत्महत्येसाठीचा सर्वोत्तम मार्ग कोणता? याबाबत आपल्या स्मार्टफोनवरील गुगलवर ४८ तास सर्च करून ८९ वेबसाईट्स खंगाळल्यानंतर
बंगळुरू : आत्महत्या कशी करावी आणि आत्महत्येसाठीचा सर्वोत्तम मार्ग कोणता? याबाबत आपल्या स्मार्टफोनवरील गुगलवर ४८ तास सर्च करून ८९ वेबसाईट्स खंगाळल्यानंतर २६ वर्षांच्या ईशाने १३ मजली उंच इमारतीवरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना बंगळुरात उघडकीस आली.
ईशा हांडा असे या तरुणीचे पूर्ण नाव आहे. फॅशन डिझायनर आणि डिझायनर कम वेलनेस कन्सल्टंट असलेल्या ईशाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप अज्ञात आहे. मात्र आत्महत्येपूर्वी तब्बल ४८ तास ती गुगलवर आत्महत्येबाबत वेगवेगळी माहिती सर्च करीत असल्याचे तिच्या स्मार्टफोनवरून स्पष्ट झाले आहे. रविवारी रात्री येथील एचएसआर लेआऊटमधील शोभा क्लासिक अपार्टमेंटच्या १३ व्या माळ्यावरून कथितरीत्या उडी घेऊन ईशाने आपली जीवनयात्रा संपवली. आधी पोलिसांनी हत्येच्या अंगाने याप्रकरणाचा तपास केला. मात्र घटनास्थळी आढळून आलेल्या तिच्या स्मार्टफोनवरून तिने आत्महत्या केल्याची शक्यता बळावली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ४८ तास तिच्या मनात आत्महत्येबाबतचेच विचार घोळत होते. आत्महत्या करण्यापूर्वी आत्महत्या कशी करावी, त्यासाठीचा प्रभावी मार्ग कोणता? यासाठीच्या तब्बल ८९ साईट्स तिने सर्च केल्या. विष प्राशन, झोपेच्या अतिरिक्त गोळ्या सेवन करणे, गळफास लावणे, रेल्वेसमोर उडी घेणे, श्वास रोखणे, इमारतीवरून उडी मारणे अशा आत्महत्येच्या अनेक मार्गांबद्दल तिने जाणून घेतले. या प्रत्येक मार्गाचा वापर आणि यातून वाचण्याची शक्यता किती, हेही तिने तपासले. सर्व पडताळणीनंतर कथितरीत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा मार्ग तिने निवडला. एवढेच नाही तर यानंतर इमारतीची उंची किती असावी, किती मजले असावे इथून तर उडी कशी घ्यावी, शहरातील उंच इमारती कोणत्या हेही तिने गुगल सर्चवर शोधले.
यानंतर रविवारी सकाळी ती बाहेर पडली. सरजपूर व हारालूर मार्गांवरील उंच इमारतींचा तिने शोध घेतला. यानंतर एचएसआर लेआऊटमधील शोभा क्लासिक अपार्टमेंटची तिने निवड केली. ही इमारत नवी होती आणि फारशी सुरक्षा नसल्याने यात शिरणे सोपे होते, असे तिला वाटले व ती खोलीवर परतली. संध्याकाळी पुन्हा एकदा सोबतच्या मैत्रिणीला मी उशिरा परतेल असे सांगून ती घरातून निघाली आणि पुन्हा परतलीच नाही. (वृत्तसंस्था)