४८ स्थानकांचा होणार पुनर्विकास
By admin | Published: May 30, 2016 03:37 AM2016-05-30T03:37:04+5:302016-05-30T03:37:04+5:30
उपनगरीय मार्गावरील ४८ स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार असून, राज्य सरकारची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.
मुंबई : मुंबईतील रेल्वे आणि स्थानके चांगली करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी उपनगरीय मार्गावरील ४८ स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार असून, राज्य सरकारची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. हार्बरवरील डीसी ते एसी परावर्तन आणि १२ डबा लोकल प्रकल्पांचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय, कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आदी अधिकारी उपस्थित होते.
मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर अनेक सोयी-सुविधा देण्यात येत आहेत. यात स्टेशनवर मोठ्या प्रमाणात सरकते जिने बसविण्याबरोबरच मशिनमध्ये पैसे टाकून पाण्याची सुविधाही दिली जात आहे. या सोयी-सुविधा देतानाच उपनगरीय मार्गांवरील स्थानकांचा पुनर्विकास रेल्वेकडून केला जाणार आहे. त्यामध्ये रेल्वेच्या असणाऱ्या जमिनींचा योग्य पद्धतीने वापर केला जाईल. जवळपास ४८ स्थानकांचा पुनर्विकास करताना रेल्वेकडून राज्य सरकारचीही मदत घेण्यात येणार असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. यावर आधुनिक सुविधा दिल्या जातील. या वेळी लोकलमधील वाढत्या गर्दीवर बोलताना प्रभू यांनी लोकलवर प्रचंड प्रमाणात ताण पडत असल्याचे सांगतानाच सध्याच्या रेल्वेत सुधारणा करणे गरजेचे आहे.
त्यासाठी लोकलचे डबे वाढविताना नवीन मार्गही वाढविण्यावर भर दिला पाहिजे. लोकलवर ताण वाढत असल्यानेच एलिव्हेटेडचा (उन्नत)पर्याय समोर ठेवल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर या कामांना वेग आला असून, लवकरच या वर्षाच्या आधीच त्यावर काम सुरू होईल, अशी ग्वाही प्रभू यांनी
दिली.
>कार्यालयीन वेळा बदला
लोकलमधील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी मुंबईतील कार्यालयांच्या वेळा बदलण्यासंदर्भात राज्य सरकारशी बोलणी सुरू असल्याची माहिती रेल्वे अर्थसंकल्पात देण्यात आली होती.
त्यानंतर प्रभू यांनी वारंवार अनेक कार्यक्रमांतून याबाबत माहिती दिली. यावर हा पर्याय योग्य आहे का, असे विचारले असता, लोकलची वाढत जाणारी गर्दी ही समस्या गंभीर आहे.
यामुळे कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यामुळे प्रवास सुकर होईल आणि हा पर्याय योग्य आहे. तत्त्वत: राज्य सरकारनेही ते स्वीकारले असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
>मुंबई-पुणे सुपरफास्ट ट्रेन
रेल्वेकडून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन सुरू केल्या जात आहेत. यात मुंबई-अहमदाबाद मार्गावर नुकतीच सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्यात आली. त्याच धर्तीवर मुंबई-पुणे सुपरफास्ट ट्रेनही सुरू करणार आहोत. तसेच तेजस, अंत्योदय, हमसफर आणि उदय नावाची ट्रेन सुरू करतानाच मुंबई-दिल्ली मार्गावर टाल्गो ट्रेनचीही चाचणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
>मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात सरकते जिने.
पाचवा-सहावा मार्ग मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी सुरू करणार. हार्बरचे दोन्ही मार्ग हे अन्य मार्गांवरून करतानाच ते एलिव्हेटेड करणार. तेव्हाच पाचवा-सहावा मार्ग मेल-एक्स्प्रेससाठी उपलब्ध होईल.
मुंबईतील प्रकल्पांसाठी एक कंपनी स्थापन करणार
मिरज-लोंडा नवीन लाइन टाकण्यासाठी केबिनेटकडून मंजुरी.
हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर डीसी ते एसी परावर्तन आणि बारा डबा लोकल सुरू होऊन बरेच दिवस झाले. या सेवा सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेकडून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे दोन्ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आता का, असा सवाल उपस्थित झाला आहे.