बापरे! कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या 50000 समीप; धोका प्रचंड वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 04:31 AM2020-07-26T04:31:08+5:302020-07-26T04:31:23+5:30
देशात ४८,९१६ नवे रुग्ण, रुग्ण १३ लाखांवर । बळींचा आकडा ३१,३५८
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशामध्ये शनिवारी एकाच दिवसात कोरोनाचे ४८,९१६ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १३ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. दोन दिवसांत देशात ९६ हजारांवर नवे रुग्ण आढळून आले होते. शनिवारी ७५७ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३१,३५८ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, उपचारांनंतर पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८,४९,४३१ झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या १३,३६,८६१ झाली असून त्यातील ४,५६,०७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण कोरोना रुग्णांपैकी पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६३.५४ टक्के आहे. देशात सलग तिसºया दिवशी कोरोनाचे ४५ हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी कोरोनाचे ४९,३१० रुग्ण तर शनिवारी ४८ हजारांवर रुग्ण आढळले. त्यामुळे दोन दिवसांत ९६ हजारांवर रुग्णांची भर पडली आहे.
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. शनिवारी बळी गेलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील २७८ जणांचा समावेश आहे.
१ कोटी ५८ लाखांवर चाचण्या
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने सांगितले की, देशात शुक्रवारी कोरोनाच्या ४,२०,८९८ चाचण्या करण्यात आल्या. आजवर एकाच दिवसात इतक्या चाचण्या कधीही करण्यात आल्या नव्हत्या. देशातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या १,५८,४९,०६८ इतकी झाली आहे.
बरे झाल्यानंतरही दीर्घकालीन विकार
कोरोना आजारातून पूर्णपणे बरे झाल्यावरही काहींना श्वसन, हृदय, यकृत किंवा डोळ्यांशी संबंधित दीर्घकालीन त्रास जाणवू लागतात. अशांना मदत करण्यासाठी केंद्रीय आरोग्य खाते मार्गदर्शक तत्त्वे तयार करीत असल्याची माहिती खात्याचे विशेष अधिकारी राजेश भूषण यांनी दिली आहे. असे विकार आटोक्यात ठेवण्याकरिता किंवा त्यातून बरे होण्याकरिता काय काळजी घ्यायची याची माहिती या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेल.