वाढत्या मॉब लिंचिंग विरोधात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 12:48 PM2019-07-24T12:48:52+5:302019-07-24T12:57:52+5:30
देशभरात वाढत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील 49 मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून मॉब लिंचिंगच्या घटना पुन्हा एकदा वाढल्या असून, त्यात काही जणांचा बळीही गेला आहे. दरम्यान, देशभरात वाढत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील 49 मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असून, या पत्रांमध्ये मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच देशात असंतोषाचे दमन होणार नाही असे वातावरण निर्माण करण्याची विनंती या मान्यवरांनी नरेंद्र मोदींना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणाऱ्या मान्यवरांमध्ये मणिरत्नम, अडूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील 49 जणांचा समावेश आहे. देशामध्ये निर्माण होणाऱ्या असंतोषाचे दमन न होता त्याला मोकळी वाट मिळेल, असे वातावरण निर्माण करावे, तसेच हा देश एक प्रबळ राष्ट्र बनावे, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांना करण्यात आली आहे.
तसेच जय श्रीराम हे आज भडकवणारे वाक्य बनले आहे. श्रीराम हे बहुसंख्याक समुदायासाठी पवित्र आहेत. त्यामुळे राम नामाचे राजकारण बंद करावे. देशभरात दलितांवरील अत्याचाराच्या 840 घटना घडल्या आहेत. यावर काय कारवाई झाली याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे, अशी विचारणाही या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.