मुस्लीम मृतदेह दफन करण्यास ५ कब्रस्तानचा विरोध; हिंदूंनी दिली स्मशानभूमीत जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 10:52 AM2020-05-29T10:52:18+5:302020-05-29T10:59:24+5:30
एका मुस्लीम व्यक्तीला दफन करण्यासाठी ५ कब्रस्तानने जागा दिली नाही कारण त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला असावा अशी भीती काही लोकांना होती.
हैदराबाद – सध्या कोरोना व्हायरसमुळे अनेक लोक दहशतीखाली जगत आहे. अनेक ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारे प्रकार घडत आहे. काही ठिकाणी घरातले मृतदेह स्वीकारायलाही पुढे येत नसल्याचं दिसून येत आहे. माणुसकी ओसाळत चालली असताना अद्यापही काहीजण ती जिंवत ठेवण्यासाठी झटत असल्याचं हैदराबाद येथील घटनेवरुन समोर आलं आहे.
एका मुस्लीम व्यक्तीला दफन करण्यासाठी ५ कब्रस्तानने जागा दिली नाही कारण त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला असावा अशी भीती काही लोकांना होती. अशावेळी परिसरात हिंदू पुढे सरसावले आणि मृतदेह दफन करण्यासाठी हिंदू स्मशानभूमीत जागा दिली. सध्या या प्रकरणाचा तेलंगणा वक्फ बोर्डाकडून तपास सुरु आहे. हैदराबादच्या गंडमगुंडा परिसरात राहणाऱ्या ५५ वर्षीय मोहम्मद ख्वाजा मिया यांचा मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्याने झाला. २२ मे रोजी ही घटना घडली.
मोहम्मद ख्वाजा यांचा मृतदेह नातेवाईक परिसरातील कब्रस्तानात दफन करण्यासाठी घेऊन गेले असता तेथील लोकांनी त्यास नकार दिला. मोहम्मद ख्वाजा हे स्थानिक नाहीत आणि कदाचित कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा अशी भीती कब्रस्तान सांभाळणाऱ्या लोकांना होती. मोहम्मदच्या नातेवाईकांनी त्यानंतर इतर ठिकाणी कब्रस्तानात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. एक, दोन नव्हे तर ५ कब्रस्तानच्या लोकांनी मृतदेह दफन करण्यास नकार दिला.
हा संपूर्ण प्रकार हिंदू समुदायातील लोकांना कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पुढाकार घेतला. त्यांनी मोहम्मद ख्वाजा यांना दफन करण्यासाठी हिंदू स्मशानभूमीत जागा दिली. त्याचसोबत ख्वाजा कुटुंबाची मदतही केली. ख्वाजा यांच्या मुलाने सांगितले की, माझ्या वडिलांना दफन करण्यासाठी एका कब्रस्तानातून दुसऱ्या कब्रस्तानात पाठवण्यात आले. परंतु परवानगी मिळाली नाही, या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेताच तेलंगणा वक्फ बोर्डाने कब्रस्तान समिती आणि तेथील लोकांना इशारा दिला आहे. मुस्लीम मृतदेह दफन करण्यास मनाई करणाऱ्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल. सध्या या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी एका समितीचं गठन करण्यात आले आहे. ही समिती चौकशी करुन अहवाल वक्फ बोर्डाला देईल.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...अन् २ वर्षापूर्वी दुरावलेल्या बाप-लेकाची भेट घडली; एका टिकटॉक व्हिडीओनं कशी केली कमाल?
लाखो रुपये किंमतीची भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सापडली; विहिरीच्या तळातून बाहेर काढण्यात यश
नवनिर्माण आता मराठी माणसाच्या हाती; कोरोनामुळे संधी आली चालून- राजू पाटील
लॉकडाऊन-5 लागू होणार? अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येने गाठला आतापर्यंतचा उच्चांक; चिंताजनक आकडेवारी