मतदानापूर्वी नोटांचा डोंगर... पाच राज्यांमध्ये आतापर्यंत १७६० कोटींची बेहिशेबी रोकड जप्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 11:08 AM2023-11-24T11:08:13+5:302023-11-24T11:09:46+5:30
पोलिसांनी तेलंगणामधील रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून ५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली.
मध्यप्रदेश, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र, मतदानापूर्वी निवडणूक आयोगही आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना दिसत आहे. पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्यापासून जवळपास १७६० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. यातच आता गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान पोलिसांनी तेलंगणामधील रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून ५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली.
तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी ही कारवाई केली आहे. ५ कोटींच्या रोख रकमेबाबत कारमधील चालकाला विचारले असता, त्यांने याबाबत काहीच सांगितले नाही. तसेच, कारममध्ये असलेल्या इतर व्यक्तींनी सुद्धा या रोख रखमेचा कोणता हिशोब दिला नाही. त्यामुळे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन तपासणीदरम्यान एका कारमध्ये दोन सुटकेस आढळून आल्या. त्या उघडून पाहिल्यावर पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी रोख रक्कम जप्त करून तिघांनाही ताब्यात घेतले.
जप्त करण्यात आलेली रोकड आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली. यापूर्वी पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्यापासून जवळपास १७६० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले होते. दरम्यान, २०१८ मध्ये या पाच राज्यांमधून मिळालेल्या रोख रकमेपेक्षा हे प्रमाण ७ पट अधिक आहे. निवडणूक आयोग राज्य आणि केंद्रीय एजन्सींच्या सहकार्याने अशा प्रकारच्या कारवाया केल्या जातात.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या घोषणेनंतर मध्यप्रदेश, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानमधून १७६० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर २०१८ मध्ये या राज्यांमधून २३९.१५ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. यापूर्वी निवडणूक आयोगाने गुजरात, हिमाचल, नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकमध्ये १४०० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली होती. गेल्या निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेच्या ११ पट हे प्रमाण आहे.