महाराष्ट्रात उष्माघातानं आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू
By admin | Published: March 30, 2017 06:30 PM2017-03-30T18:30:12+5:302017-03-30T18:30:12+5:30
गेल्या काही दिवसांपासून चैत्रातील उन्हाचे चटके जाणवू लागले असून, वातावरणातील उष्म्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - गेल्या काही दिवसांपासून चैत्रातील उन्हाचे चटके जाणवू लागले असून, वातावरणातील उष्म्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे लोकांच्या जीव कासावीस होतोय. मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र व कोकण-गोव्याच्या काही भागांत तापमाननं कमालीचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. त्यातच उष्माघातानं आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.
मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला या उष्म्याचा जास्त फटका बसल्याची माहितीही भारतीय हवामान खात्यानं दिली आहे. तर कोकणातल्या भिरा येथे मंगळवारी देशातील सर्वाधिक कमाल तापमान 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मालेगाव, सोलापूर, जळगाव येथे गेल्या काही दिवसांपासून तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर जात होते. मंगळवारी नाशिक, सातारा ही तुलनेने थंड असलेल्या ठिकाणांवरही सर्वाधिक तापमान नोंदलं गेलं आहे. मात्र महाराष्ट्रात उष्णतेच्या लहरी नसल्याचं निर्वाळा देत हवेतील उष्णतेमुळे भीरामध्ये एवढं तापमान नोंदवण्यात आल्याची माहितीही भारतीय हवामान खात्याचे व्ही. के. राजीव यांनी दिली आहे.
तसेच येत्या काही दिवसांत तापमानात अशीच वाढ राहणार असल्याचंही भारतीय हवामान खात्यानं सांगितलं आहे. त्याप्रमाणेच राजस्थानातील बारमेरमध्ये 43.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हरियाणात 42 अंश सेल्सियस, उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी, अलाहाबाद, हामीरपूर आणि आग्रा येथेही तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर गेलं होतं. त्यामुळे उष्णतेची लाट आणखी काही दिवस देशभरात जाणवणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिलं आहे.