अलर्ट! 'या' पाच फेक CoWin Vaccine अॅपपासून सावधान, नाहीतर होईल पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 07:09 PM2021-05-13T19:09:16+5:302021-05-13T19:09:51+5:30
देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढलेला असताना या भयानक संकटावर मात देण्यासाठी लसीकरण मोहीम देखील वेगानं करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढलेला असताना या भयानक संकटावर मात देण्यासाठी लसीकरण मोहीम देखील वेगानं करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणचं बुकिंग करण्यासाठी केंद्र सरकारनं को-विन (CoWin ) रजिस्ट्रेशन अॅप सुरू केलं आहे. पण अॅपमध्ये स्लॉट रजिस्टर करण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. लसींची उपलब्धता मर्यादित असल्यानं लसीकरणासाठीचे स्लॉट अवघ्या काही मिनिटांत बूक केले जात आहेत. त्यामुळे तातडीनं स्लॉट बूक करण्यासाठी इंटरनेटवर वेगवेगळे पर्याय आजमवले जात आहेत आणि इथंच इंटरनेट हॅकर्स आपलं जाळं टाकतात. त्यामुळे केंद्र सरकारनं फेक को-विन अॅप्सपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
भारतीय कॉम्प्यूटर इमरजंसी रिस्पॉन्स टीम (CERT-In) नं नागरिकांना फेक CoWin लस रजिस्ट्रेशन अॅपबद्दल सावध करण्यासाठी एक परिपत्रक जारी केलं आहे. लसीकरणासाठी स्लॉट बूक करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या घाईगडबडीचा नेटिझन्स फायदा घेत आहेत.
हॅकर्स एक फेक मेसेज युझरच्या मोबाइलवर पाठवतात आणि फेक अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठवतात. मोबाइल SMS च्या माध्यमातून फेक मेसेजेस सध्या व्हायरल केले जात आहेत. फेक SMS मध्ये युझरला पाच फेक अॅप डाऊनलोड करण्यासाठीची गळ घातली जाते.
को-विन रजिस्ट्रेशनसाठी फेक अॅप APK फाइल्सची यादी
- Covid-19.apk
- Vaci__Regis.apk
- MyVaccin_v2.apk
- Cov-Regis.apk
- Vccin-Apply.apk
मोबाइल SMS मध्ये एक लिंक दिली जाते. या लिंकवर क्लिक करुन वरील फेक अॅप्स डाऊनलोड केले गेले तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. फेक अॅपच्या एपीके डाऊनलोड झाल्यानं तुमचं किती नुकसान होऊ शकतं याचा अंदाज या गोष्टीवरुन लावता येईल की फेक अॅपच्या SMS मधील लिंकवर क्लिक केल्यानंतर अगदी तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टपर्यंत याचा प्रभाव होतो. संबंधित अॅपला अवैधरित्या सर्व परवानग्या मिळून जातात आणि याच्याच माध्यमातून हॅकर्स तुमची संपूर्ण माहिती मिळवतो.
Cowin किंवा Aarogya Setu वरुनच करा रजिस्ट्रेशन
देशात संपूर्ण लसीकरण प्रक्रिया डिजिटल पद्धतीनंच हाताळली जात आहे. यात लसीकरणासाठी सर्व नागरिकांना केवळ CoWin वेबसाइट (cowin.gov.in) किंवा आरोग्य सेतू (Aarogya Setu) अॅप यांचाच वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, Paytm आणि Healthifyme यांच्यासारखे काही थर्ड पार्टी वॅक्सीन ट्रॅकर अॅप्स देखील आहेत. पण यातून तुम्हाला केवळ लसींच्या उपलब्धतेची माहिती दिली जाते. यात तुम्ही लसीसाठी रजिस्ट्रेशन करू शकत नाही.