आजपासून हॉटेलवरील जेवणावर ५ टक्केच जीएसटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:56 AM2017-11-15T02:56:01+5:302017-11-15T02:56:54+5:30
हॉटेलातील जेवणावर बुधवारी, १५ नोव्हेंबरपासून ५ टक्केच जीएसटी आकारण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली होती.
मुंबई : हॉटेलातील जेवणावर बुधवारी, १५ नोव्हेंबरपासून ५ टक्केच जीएसटी आकारण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली होती. त्यानंतर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी या निर्णयाची अंमलबजावणी न करणा-या हॉटेल चालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र या घोषणेची मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अधिसूचनाच जारी न झाल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर ग्राहकांच्या हितासाठी अधिसूचनेविनाच बुधवारपासून ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय हॉटेल चालकांनी घेतला आहे.
घोषणा करणा-या सरकारने राज्यात अधिसूचनाच जारी केली नसल्याने राज्यातील हॉटेल व्यवसायिकांची कोंडी झाली होती. हॉटेल व्यवसायिकांच्या आहार संघटनेचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ५ टक्के जीएसटी आकारण्याची संपूर्ण तयारी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. केवळ तांत्रिक कारणास्तव ग्राहकांचे नुकसान होऊ नये, म्हणून सर्व हॉटेल व्यवसायिकांनी १२ व १८ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.