१२ राज्यांतून प्रवास करणाऱ्या ५ भारतीय रेल्वे; दिब्रूगढ़ - कन्याकुमारी अंतर ४२४७ किलोमीटर, लागतात ८२.५० तास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 07:21 AM2021-08-17T07:21:21+5:302021-08-17T07:22:00+5:30
Indian Railways : लाखो लोकांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेंमध्ये कन्याकुमारीहून कश्मीरपर्यंत आणि ईशान्य भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेंचा यात समावेश आहे.
नवी दिल्ली : कोरोना महामारीचा वेग कमी होताच इंडियन रेल्वेनेरेल्वेंचा वेग आणि संख्या वाढवली आहे. लाखो लोकांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेंमध्ये कन्याकुमारीहून कश्मीरपर्यंत
आणि ईशान्य भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेंचा यात समावेश
आहे.
यात अशा काही रेल्वे आहेत की, ज्या १२-१२ राज्यांत प्रवास करून ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात. यात त्यांना अनेक दिवस लागतात. भारतात सर्वात लांबचा प्रवास करणाऱ्या या आहेत पाच रेल्वे.
१ दिब्रूगढ कन्याकुमारी विवेक एक्स्प्रेस : भारतात सर्वात लांबच्या अंतराचा प्रवास करणाऱ्या रेल्वेंत ही क्रमांक एक आहे. ही रेल्वे दिब्रूगढ़ ते कन्याकुमारी हे ४२४७ किलोमीटरचे अंतर ८२.५० तासांत पूर्ण करते. या प्रवासात ही रेल्वे ५७ स्थानकांवर थांबते.
२ कटरा-कन्याकुमारी हिमसागर एक्स्प्रेस : ही देशातील लांबचा प्रवास करणारी दुसरी रेल्वे आहे. हिचा प्रवास ३७८२ किलोमीटरचा असून तो पूर्ण करण्यासाठी ७१ तास ४० मिनिटे लागतात. ही गाडी माता वैष्णो देवी कटरा हून कन्याकुमारीला पोहोचते. १२ राज्यांतून जाणारी ही रेल्वे ७५ स्थानकांवर थांबते. याशिवाय भारतात कोणत्याही रेल्वेला इतक्या ठिकाणी थांबावे लागत नाही.
३ कटरा-मंगळुरू नवयुग एक्स्प्रेस : ही रेल्वे देशात तिसरी सर्वात लांबचा प्रवास करणारी आहे. ती जम्मू-कश्मीरमधील कटराहून मंगळुरूला पोहोचते. हा प्रवास ७२.५० तासांचा असून ३६७४ किलोमीटरचे अंतर कापते. ही रेल्वे १२ राज्यांत ६७ स्थानकांवर थांबते.
४ न्यू तिनसुकिया-बंगळुरू सिटी एक्स्प्रेस : ही रेल्वे आसाममधील न्यू तिनसुकियाहून निघून ६५ तास ५५ मिनिटांत ३६१५ कि.मी.चा प्रवास करून बंगळुरूला थांबते.
५ गुवाहाटी-तिरुअनंतपूरम एक्स्प्रेस : आसाममधील गुवाहाटीहून निघून केरळमधील त्रिवेंद्रमपर्यंत जाते. या प्रवासासाठी ६४.१५ तास लागतात व ३५५२ किलोमीटरचा प्रवास घडतो. ५० स्थानकांवर ती थांबते.