मोदी-जिनपिंग भेटीतून भारताला काय मिळालं?... पाच ठळक मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 06:30 PM2018-04-28T18:30:10+5:302018-04-28T18:30:10+5:30
संगीत, चहापान, शाही भोजन, नौकाविहार करता करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शी जिनपिंग यांच्याशी बरीच चर्चा केली.
नवी दिल्लीः चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या वर्षी दिलेलं आमंत्रण स्वीकारून 'शेजाऱ्या'कडे चहापानासाठी गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी घराकडे यायला निघालेत. चीनचं हृदय मानल्या जाणाऱ्या वुहान शहरात मोदी जवळपास २४ तास होते. त्यांचा हा दौरा अनौपचारिक असला तरी, संगीत, चहापान, शाही भोजन, नौकाविहार करता करता त्यांनी शी जिनपिंग यांच्याशी बरीच चर्चा केली. त्यात देशाला फायदेशीर ठरतील अशा काही गोष्टी घडल्यात.
१. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करून आर्थिक पातळीवर एकत्र काम करण्यास भारत-चीनमध्ये एकमत झालं आहे. अफगाणिस्तानातील दहशतवाद मिटवण्यासाठी चीनची साथ मिळणं ही जमेची बाजू आहे.
२. भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनेही दोन नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. २००५मध्ये जे निकष निश्चित करण्यात आले होते, त्या आधारावरच विशेष प्रतिनिधी दुसऱ्या टप्प्यात चर्चा करतील, असं यावेळी ठरवण्यात आलंय.
३. भारत-चीन सीमेवर शांतता-स्थैर्य राहावं, यादृष्टीने दोन्ही देश आपापल्या लष्कराला आचारसंहिता देणार आहेत. त्यामुळे पुन्हा डोकलामसारखी परिस्थिती निर्माण न होण्यास मदत होऊ शकेल.
४. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक अधिक संतुलित आणि टिकाऊ करण्याच्या दृष्टीने दोन्ही देश पावलं टाकणार आहेत.
५. मोदी आणि जिनपिंग यांच्यातील मैत्रीचं नातं या भेटीमुळे आणखी दृढ झालं आहे. हुबई म्युझियममध्ये जिनपिंग स्वतः मोदींसोबत गेले, त्यांना ऐतिहासिक कलाकृती दाखवल्या. २० मिनिटांऐवजी ते ४० मिनिटं तिथे होते आणि गप्पांमध्ये रंगले होते. या मैत्रीमुळे दोन देशांमधील संवाद वाढून वाद मिटण्यास फायदा होऊ शकतो.