‘आयुष्यमान भारत’साठी हवेत ५ लाख डॉक्टर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 06:54 AM2018-04-29T06:54:37+5:302018-04-29T06:54:37+5:30
गरिबांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची ‘आयुष्यमान भारत’ योजना तडीस नेण्यासाठी देशाला ५ लाख डॉक्टरांची गरज आहे. त्यासाठी प्रसंगी विदेशात राहणाऱ्या भारतीय डॉक्टरांना पाचारण केले जाईल
मुंबई : गरिबांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची ‘आयुष्यमान भारत’ योजना तडीस नेण्यासाठी देशाला ५ लाख डॉक्टरांची गरज आहे. त्यासाठी प्रसंगी विदेशात राहणाऱ्या भारतीय डॉक्टरांना पाचारण केले जाईल, असे निती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल यांनी येथे सांगितले.
डॉ. पॉल यांनी शनिवारी मुंबईत भारतीय उद्योग महासंघातर्फे (सीआयआय) आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. विकसित देशांमध्ये प्रति लाख स्पेशालिस्ट डॉक्टरांची संख्या ५० आहे. भारतात हा आकडा फक्त ५.३ आहे. ‘आयुष्यमान भारत’समोर हेच सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील आजवरच्या सर्व सरकारी वैद्यकीय विमा योजना काही ना काही कारणाने अयशस्वी ठरल्या. त्या उद्दिष्ट पूर्णच करू शकल्या नाहीत. आता मात्र आयुष्यमान योजनेत ४० टक्के गरिबांना सामावून घेतले जाईल, असे ते म्हणाले.
उपचारांची १३00 पॅकेजेस
या योजनेतील वैद्यकीय उपचारांची १३०० पॅकेजेस केंद्राने तयार केली आहेत. उपचारांसाठीचे दरही निश्चित आहेत. देशभर एकच दर ठेवण्याचा विचार सुरू आहे.योजनेसाठी छोट्या शहरांमधील इस्पितळांची गरज आहे. मोठी इस्पितळेही लागतीलच. पण वैद्यकीय क्षेत्राने दरवेळेस केवळ नफेखोरीचा विचार करू नये, असे आवाहन डॉ. पॉल यांनी केले.
लवकरच निविदा
या योजनेत वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्वांनीच सहभागी होणे आवश्यक आहे. याची निविदा लवकरच काढली जाईल. योजना राज्यांनी राबवायची आहे. त्यामुळे राज्यांना गरज भासल्यास केंद्राच्या धर्तीवरच स्वतंत्र निविदा त्यांना काढता येईल, असे डॉ. पॉल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
या योजनेतील लाभार्थींना वेगळी नोंदणी करावी लागणार नाही. कुठल्या क्षेत्रातील कोणाचा योजनेत समावेश असेल, याची यादी केंद्राने तयार केली आहे. देशात अशी १० कोटी ७४ लाख कुटुंबे आहेत, असे डॉ. पॉल म्हणाले.