Corona Vaccination लसीकरणासाठी काशी पीठाची ५ लाखांची देणगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 06:14 AM2021-06-01T06:14:54+5:302021-06-01T06:15:16+5:30
जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की, सध्या सर्वांचे सुरक्षाकवच म्हणजे लसीकरण होय. त्यामुळे सुरक्षाकवच असलेली ही लस सर्वांनी घ्यावी, या उद्देशाने प्रधानमंत्री केअर्स फंडला ५ लाख रुपये दिले आहेत.
वाराणसी : सनातन वीरशैव धर्माच्या पंचपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी प्रधानमंत्री केअर्स फंडला पाच लाख रुपये देणगी दिली. वाराणसीचे आयुक्त दीपक अग्रवाल यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला.
जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की, सध्या सर्वांचे सुरक्षाकवच म्हणजे लसीकरण होय. त्यामुळे सुरक्षाकवच असलेली ही लस सर्वांनी घ्यावी, या उद्देशाने प्रधानमंत्री केअर्स फंडला ५ लाख रुपये दिले आहेत. लसीकरणाविषयी गैरसमज करून घेऊ नये. संशोधक आणि डॉक्टर यांच्या आवाहनावर सर्वांनी विश्वास ठेवावा.
काशी पीठाकडून महाराष्ट्रातील मंगळवेढ्यामध्ये कोविड उपचार केंद्र स्थापन केल्याबद्दल तसेच कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील अनाथ मुलांची शिक्षण, निवास व महाप्रसादाची जबाबदारी काशी पीठाने घेतल्याबद्दल वाराणसीचे आयुक्त दीपक अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केले. महास्वामीजींची देणगी अत्यंत श्रद्धेने स्वीकारून प्रधानमंत्री केअर्स फंडला हा निधी सुपूर्द करण्याचे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले.