देवदर्शनाहून परतताना कार आणि बसचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:17 IST2024-12-25T15:15:21+5:302024-12-25T15:17:02+5:30
Rajasthan Accident: राजस्थानमधील करौली जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील होते.

देवदर्शनाहून परतताना कार आणि बसचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
राजस्थानमधील करौली जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील होते. अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अपघातस्थळी येत मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवले.
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार सलेमपूर-कुडगाव मार्गावर हा अपघात झाला. इंदूर येथील नयन देशमुख हे आपल्या कुटुंबीयांसह कैलादेवी मंदिरात दर्शन घेऊन येत होते. ते कुडगाव रोडवर पोहोचले तेव्हा कार आणि बसमध्ये भीषण टक्कर झाली.
करौलीचे पोलिस अधीक्षक ब्रजेश ज्योती उपाध्याय यांनी सांगितले की, कारमधून प्रवास करत असलेले लोक दर्शन घेऊन गंगापूर सिटीच्या दिशेने जात होते. त्यादरम्यान कुडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सलेमपूर-कुडगाव मार्गावर हा अपघात झाला. बस आणि कारमधील टक्कर एवढी जोरदार होती की त्यात कारचा चेंदामेंदा झाला. तसेच कारचा पुढील भाग बसखाली जाऊन अडकला.
या अपघातात कारमध्ये स्वार असलेल्या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नयन देशमुख (६०), नयन देशमुख यांचा मुलगा खूश देशमुख (२२), मुलगी मानस्वी देशमुख (२५), बहीण प्रीती भट्ट आणि नातेवाईक अनिता यांचा समावेश आहे.