सुप्रीम कोर्टाच्या ५ नव्या न्यायाधीशांनी घेतली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 12:49 PM2023-02-07T12:49:37+5:302023-02-07T12:51:17+5:30
पाच न्यायाधीशांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या ३२ वर गेली आहे, जी त्याच्या मंजूर संख्येपेक्षा दोनने कमी आहे.
नवी दिल्ली : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात झालेल्या शपथविधी समारंभात पाच न्यायाधीश-न्यायमूर्ती पंकज मिथल, न्यायमूर्ती संजय करोल, न्यायमूर्ती पी. व्ही. संजय कुमार, न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांनी शपथ घेतली.
पाच न्यायाधीशांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या ३२ वर गेली आहे, जी त्याच्या मंजूर संख्येपेक्षा दोनने कमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गेल्यावर्षी १३ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी या पाच न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली होती.
कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पंकज मिथल, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय करोल, मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. व्ही. संजयकुमार, पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांची सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती जाहीर केली होती.