12 तासांत 5 जणांनी गमावला जीव; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची शक्यता, गावात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 04:37 PM2023-02-22T16:37:54+5:302023-02-22T16:41:37+5:30
पाच जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. एकाच वेळी पाच जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी सांगतात की, विविध आजारांमुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र गावामध्ये पाचही जणांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. गंगा घाटावर सर्व मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री कुणाची तब्येत बिघडली तर कुणाला सकाळी स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 4 मृतांचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त आहे, तर एकाचे वय 50 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. खीरों ब्लॉकच्या भीतरगावमधील ग्रामस्थांसाठी मंगळवारचा दिवस वाईट ठरला. वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी झालेल्या पाच मृत्यूमुळे सर्वांना धक्का बसला आहे.
सोमवारी रात्रीपर्यंत सर्वजण निरोगी होते आणि रात्री प्रकृती बिघडली, त्यानंतर सकाळी स्थानिक लोक आणि कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. एकाचवेळी 5 मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनानेही गावात पोहोचून या प्रकरणाची चौकशी सुरू केली
12 तासांत गावातील पाच जणांनी आपला जीव गमावला आहे. या मृत्यूमागचे कारण काय, हे अद्यापही जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकारी शोधू शकलेले नाहीत. या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा प्रशासन कारवाई करताना दिसत असले तरी आरोग्य विभागाचे उच्च अधिकारी मात्र या मृत्यूमागे हृदयविकाराचा झटका किंवा कुठला तरी आजार असल्याचे सांगत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"