पेट्रोल भरताय? मग या पाच मोफत सेवांचा लाभ जरुर घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 12:08 PM2018-07-25T12:08:50+5:302018-07-25T12:09:29+5:30
पेट्रोल पंपावर इंधन भरुन घेतले, पैसे दिले की काम संपलं असं होत नाही. तुमच्या अधिकारांची माहिती तुम्हाला असली पाहिजे.
मुंबई- पेट्रोल भरताना तुम्ही अगदी घाईघाईत पंपावर जाता का? पुढच्या कामासाठी जाण्यासाठी झटकन पैसे दिले, पेट्रोल भरलं की लगेच बाहेर पडलं असं तुम्ही करत असाल तर तुम्ही तुमचे काही अधिकार जाणून घेतलेच पाहिजेत. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोल कंपन्यांनी काही सुविधा ग्राहकांना दिलेल्या असतात. त्यांचा योग्यवेळेस ग्राहक लाभ घेऊ शकतात.
1) मोफत हवा- ग्राहकांना पेट्रोल पंपांवरती वाहनाच्या चाकामध्ये हवा मोफत भरून मिळते. पेट्रोलपंप दिवसभरात जेवढे तास सुरु असतो, त्यावेळेत ही सेवा उपलब्ध असते. तसेच हवा भरुन घेताना टीप देण्याची आवश्यकता असतेच असे नाही.
2) शौचालय- प्रत्येक पेट्रोलपंपावर अत्यंत स्वच्छ शौचालये असली पाहिजेत. वाहनालकांच्या वापरासाठी ती उपलब्ध असली पाहिजेत.
3) प्रथमोपचार पेटी- पेट्रोलपंपावर मिळणारी ही महत्त्वाची सुविधा आहे. प्रत्येक पेट्रोलपंपावर प्रथमोपचाराचे साहित्य असणारी पेटी ग्राहकांसाठी उपलब्ध असली पाहिजे.
4) उत्पादनांचा योग्य दर्जा आणि प्रमाण- इंधन भरुन घेताना सर्व प्रक्रिया अचूक असणे हा ग्राहकांचा अधिकार आहे. इंधन भरुन घेण्यापूर्वी ग्राहकांनी मशीनवर शून्य असल्याशिवाय इंधन घेऊ नये. तसेच ग्राहकांना त्याचे आकडे दाखवण्याची जबाबदारीही पंपावरील कर्मचाऱ्यांची आहे.
5) संपर्काची सोय- पेट्रोलपंपासंबधीत लोकांचे फोन क्रमांक पंपावर उपलब्ध असले पाहिजेत तसेच तेथे सूचना आणि तक्रारी करण्यासाठी वही उपलब्ध असावी.