५ सेकंदाचा थरार CCTV त कैद; दुकानाबाहेर लोकांची गर्दी, अचानक जमीन धसली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 03:16 PM2021-10-19T15:16:08+5:302021-10-19T15:16:26+5:30
या दुर्घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये नगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाविरोधात संताप निर्माण झाला.
आझमगड – यूपीच्या आझमगड जिल्ह्यात एक अजब घटना घडली ज्यात एका दुकानाबाहेर ग्राहकांची रांग लागली होती यातच अचानक जमीन धसली. जवळपास १० ते १५ फूटाचा एक खोल खड्डा बनला. जो जिथे होता तिथून मागे पळत स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. या दुर्घटनेतील १०-१२ लोकांना वाचवण्यात यश आले. ही संपूर्ण दुर्घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या दुर्घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये नगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाविरोधात संताप निर्माण झाला. हरबंशपूर परिसरातील आरटीओ चौकात ही दुर्घटना घडली. ज्याठिकाणी जमीन धसून अचानक दलदल निर्माण झाली. यात १०-१२ लोकं खाली पडली. या दुर्घटनेची चर्चा सध्या सर्व जिल्हाभर सुरू आहे. अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि नाले सफाई होत नसल्याने पाण्याचा साठा तयार झाला आहे. त्यामुळे जमिनीच्या आतमध्येच पाणी मुरत असल्याने परिसरातील दुकानं आणि घरांना धोका निर्माण झाला आहे.
या दुर्घटनेवरुन लोकांनी स्थानिक नगरपालिकेला जबाबदार धरलं आहे. प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात येत नसल्याने पाण्याचा प्रवाह वाढत चालला आहे. सोमवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर पाण्याचा दबाव वाढला आणि अचानक जमीन धसली. ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा दुकानाबाहेर लोकांची गर्दी होती. ज्यात महिला, लहान मुलांसह वृद्धांचा सामान खरेदी करण्यासाठी गर्दी होती. अचानक जमीन सरकल्यानंतर दुकानातील सामानही खाली पडलं. ही घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. वेळीच लोकांना रेस्क्यू करुन त्यांचा जीव वाचवण्यात आला.
उत्तर प्रदेशातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/wF2EfDvXzu
— Lokmat (@MiLOKMAT) October 19, 2021