लडाखमध्ये ५ जवान शहीद! टी-७२ रणगाडा बुडाला, युद्धसरावादरम्यान घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 05:49 AM2024-06-30T05:49:44+5:302024-06-30T05:50:34+5:30
नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली आणि त्यात रणगाडा वाहून गेला.
सुरेश एस. डुग्गर
लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : युद्धसरावादरम्यान रशियन बनावटीच्या टी-७२ रणगाड्यात बसून श्योक नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेले भारतीय लष्कराचे पाच जवान अचानक आलेल्या पुरामुळे बुडाले व शहीद झाले. लडाख येथील न्योमा-चुशूल भागामध्ये चीनला लागून असलेल्या नियंत्रण रेषेच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्र उलटल्यानंतर ही दुर्घटना घडली. नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली आणि त्यात रणगाडा वाहून गेला.
काँग्रेसकडून तीव्र शोक
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले की, रणगाडा अपघातात पाच जवान शहीद झाले, हा अतिशय दु:खद प्रसंग आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की, पाच जवानांनी दिलेल्या बलिदानासाठी देश त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा कायम ऋणी राहील.
लडाखमध्ये पाच जवान शहीद होणे ही अतिशय दु:खद घटना आहे. संपूर्ण देश शहीद झालेल्या शूर जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे. - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री