इसिसशी संबंध असल्याचा संशय, केरळमधून 5 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 05:16 PM2017-10-25T17:16:24+5:302017-10-25T17:16:28+5:30
आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याच्या संशयातून केरळ येथून पाच तरूणांना अटक करण्यात आली आहे.
कन्नूर - आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याच्या संशयातून केरळ येथून पाच तरूणांना अटक करण्यात आली आहे. 25 ऑक्टोबर रोजी केरळच्या कन्नूर परिसरातून स्थानिक पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तुर्की येथून हे पाच जण भारतात परतणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली.
केरळमधील वेलापट्टणम आणि चक्करकल या भागातील ते मुळचे रहिवासी आहेत. या पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर कन्नूरचे पोलीस उपअधीक्षक पी. पी. सदानंदन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांची कसून चौकशी केली. यावेळी हे तीघेही तुर्कस्तानातून भारतात परतल्याचे समोर आले आहे.
तीनच दिवसांपूर्वी भारतीय तरुणांत कट्टरता रुजवून, त्यांनी इस्लामिक स्टेट (इसिस) मध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रोत्साहन देणा-या कारेन आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समध्ये अटक करण्यात आली आहे.
एनबीआयच्या पथकाने मनिला येथील घरातून कारेन आयशाला अटक केली. कारेन आयशा भारतीय वंशाची आहे. भारत व अन्य देशांतील तरुणांनी इसिसमध्ये सहभागी व्हावे, यासाठी ती आॅनलाइन प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावत होती. आयशा हमीडॉनचा पती मोहम्मद जाफर माकवीद फिलिपीन्समधील दहशतवादी कृत्यांत सहभागी झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर आयशा इसिसाठी काम करीत होती. भारतीय तपास यंत्रणेला गेल्या वर्षी आयशाच्या आॅनलाइन कारवायांची माहिती मिळाली. त्यानंतर भारताने अन्य देशांनाही तिच्या कारवायांची माहिती दिली. विविध सोशल मीडियाचा वापर करून ती भारतीय तसेच अन्य देशातील तरुणांची माथी भडकवत होती.