दरमहा ५ हजारांत सुखासीन आयुष्य शक्य नाही
By admin | Published: December 22, 2016 12:50 AM2016-12-22T00:50:41+5:302016-12-22T00:50:41+5:30
दिल्लीसारख्या महानगरांत दैनंदिन राहणीमानासाठी लागणारा खर्च विचारात घेता विभक्त राहणारी पत्नी दरमहा पाच हजार रुपयांच्या
नवी दिल्ली : दिल्लीसारख्या महानगरांत दैनंदिन राहणीमानासाठी लागणारा खर्च विचारात घेता विभक्त राहणारी पत्नी दरमहा पाच हजार रुपयांच्या पोटगीत आरामदायी आयुष्य जगू शकत नाही, असे स्पष्ट करून दिल्ली न्यायालयाने पतीची या पोटगीचा आदेश रद्द करण्याची मागणी फेटाळली.
विभक्त राहणाऱ्या पत्नीला दरमहा पाच हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश महानगर दंडाधिकाऱ्यांनी पतीला १६ जानेवारी २०१५ रोजी दिला होता. महानगर दंडाधिकाऱ्यांनी पोटगी देण्याच्या आदेशात त्यामुळेच मला कोणतीही बेकायदेशीरपणा किंवा शारीरिक, मानसिक वा नैतिक दुर्बलता आढळत नाही, असे सत्र न्यायाधीशांनी म्हटले आहे. मी वर्षभरापासून बेरोजगार आहे हा पतीचा युक्तिवादही शर्मा यांनी मान्य केला नाही. शर्मा म्हणाले की कायद्याचे कायमचे म्हणणे असे आहे की प्रत्येक धडधाकट व्यक्ती ही त्याची पत्नी आणि मुलांचा सांभाळ करण्यास सक्षम आहे. त्यामुळे पतीच्या म्हणण्याचा विचार करता येणार नाही. पतीपासून विभक्त राहणाऱ्या या पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार पोलिसांकडे दिली होती. पत्नी स्वत: दरमहा २० हजार रुपये कमवत असून तिने माझ्याकडून पैसे काढण्यासाठी माझ्याविरोधात खोटी तक्रार दिली,असा आरोप तिच्या पतीने अपिलात केला होता.
पतीचे अपिल न्यायालयाने फेटाळले परंतु खटल्याच्या सुनावणीत पत्नी जर गुणवत्तेच्या मुद्यांवर अपयशी तर या पतीकडून आतापर्यंत पोटगी म्हणून मिळालेली रक्कम तिला परत करावी लागेल, असेही न्यायालयाने आदेश दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)