झोपेतून उठवले नाही म्हणून रेल्वेला ठोठावला 5 हजाराचा दंड
By admin | Published: April 29, 2017 12:29 PM2017-04-29T12:29:36+5:302017-04-29T12:46:01+5:30
रेल्वेने स्टेशन येण्याआधी वेकअप कॉल दिला नाही म्हणून ग्राहक न्यायालयाने रेल्वेला 5 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 29 - रेल्वेने स्टेशन येण्याआधी वेकअप कॉल दिला नाही म्हणून ग्राहक न्यायालयाने रेल्वेला 5 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. मध्यप्रदेशच्या बेतुल जिल्ह्यातील गिरीश गर्ग 13 जून 2015 रोजी कोईमबतूर-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसने कोटा येथे चालले होते. रात्री 1.40 ही ट्रेनची कोटा येथे पोहोचण्याची नियोजित वेळ होती.
गिरीश गर्ग यांनी त्यांच्या मोबाईलवरुन रेल्वेच्या 139 क्रमांकावर फोन करुन ग्राहक सेवा अधिका-याला स्टेशन येण्याआधी वेकअप कॉल देण्यास सांगितला. रेल्वेने प्रवाशांसाठी 139 क्रमांकावर वेकअप कॉलची सुविधा दिली आहे. तुम्ही मोबाईलवरुन ग्राहक सेवा कक्षाला कळवल्यानंतर तुमच्या मोबाईलवर स्टेशनजवळ आल्यानंतर कॉल येतो. प्रवाशांना ज्या स्टेशनवर उतरायचे आहे तिथेच उतरता यावे यासाठी रेल्वेने ही वेकअप कॉलची सुविधा सुरु केली आहे.
गिरीश गर्ग यांना ग्राहकसेवा अधिका-याने तुमचा नंबर रजिस्टर झाला असून, स्टेशन येण्याआधी तुमच्या मोबाईलवर कॉल येईल असे सांगितले. त्यामुळे गर्ग निर्धास्तपणे झोपून गेले. पण गर्ग यांच्या मोबाईलवर ना मेसेज आला, ना कुठला कॉल. कोटा स्थानक आल्यानंतर गर्ग यांना जाग आली पण ट्रेनमधून उतरताना त्यांची धावपळ झाली.
त्यानंतर गिरीश गर्ग यांनी रेल्वेच्या या बेजबाबदारपणाबद्दल ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला. मला जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल रेल्वेने 20 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी याचिकेत केली. रेल्वेने न्यायालयात आपली बाजू मांडताना सांगितले की, 139 क्रमांकाच्या सुविधेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे ही याचिका रद्द करावी असे रेल्वेने सांगितले.
पण ग्राहक न्यायालयाला रेल्वेचा दावा पटला नाही. 26 एप्रिल 2017 रोजी न्यायालयाने रेल्वेला गर्ग यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल 5 हजार रुपये नुकसानभरपाई आणि 2 हजार रुपये कायदेशीर लढाईचा खर्च म्हणून देण्याचे आदेश दिले.