त्यांचे पाच खासदार कधीही राजीनामा देऊ शकतात; भाजप नेत्याच्या दाव्यानं खळबळ
By कुणाल गवाणकर | Published: November 21, 2020 07:02 PM2020-11-21T19:02:21+5:302020-11-21T19:03:34+5:30
West Bengal polls 2021: भाजप खासदाराच्या दाव्यामुळे सत्ताधारी पक्षात खळबळ
कोलकाता: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकारण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय मानले जाणारे तृणमूलचे दिग्गज नेते शुभेंदू अधिकारी भाजपमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी तृणमूलचे वरिष्ठ खासदार सौगत रॉय यांच्यासह ५ खासदार कधीही राजीनामा देऊन भाजपमध्ये येतील, असा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पश्चिम बंगालमधल्या डमडमचे खासदार सौगत रॉय यांच्यासह ५ लोकसभा सदस्य लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा अर्जुन सिंह यांनी केला आहे. सिंह भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून ते लोकसभेत बॅरकपूर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. सौगत रॉय तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात ते मंत्री होते. ते चौथ्यांदा खासदार असून त्याआधी त्यांनी ५ वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे.
Five Trinamool Congress MPs will resign anytime. Saugata Roy (TMC MP) pretends to be a TMC leader in front of camera: BJP MP Arjun Singh. #WestBengalpic.twitter.com/ngW4CdryTy
— ANI (@ANI) November 21, 2020
अर्जुन सिंह यांनी २४ परगणा जिल्ह्यातल्या जगदल घाटावरील छठ पूजेत सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी तृणमूलला लवकरच मोठं खिंडार पडणार असल्याचे दावे केले. 'शुभेंदू अधिकारी एक मोठे नेते आहेत. शुभेंदू आणि त्यांच्यासारख्या इतर नेत्यांनी संघर्ष केल्यामुळेच ममता बॅनर्जी मोठ्या नेत्या झाल्या. त्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली आहे. मात्र आता ममता त्यांचं योगदान विसरल्या आहेत. स्वत:च्या भाच्याला खुर्चीत बसवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ममता यांनी शुभेंदू यांच्यासारख्या नेत्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडायला हवा,' असं सिंह म्हणाले.
I reject Arjun's statement with the contempt it deserves. Arjun is a 'Bahubali' involved in illegal financial dealings. Arjun can say nothing but lies, he has alleged that I am also in the queue to join BJP. I can state that I shall not join BJP even if I die: Saugata Roy, TMC MP https://t.co/XVjTcE8WtLpic.twitter.com/RlAjgLfbo1
— ANI (@ANI) November 21, 2020
सौगत राय यांचं सिंह यांना उत्तर
तृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी सिंह यांच्या दाव्यात कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. अर्जुन सिंह बाहुबली नेते आहेत. त्यांचा अनेक बेकायदेशीर आर्थिक व्यवहारात हात आहे. ते काहीही बोलू शकतात. मीदेखील भाजप प्रवेशासाठी रांगेत उभा असल्याचा त्यांचा दावा आहे. पण मी मेलो तरीही भाजपमध्ये जाणार नाही, असं रॉय यांनी स्पष्ट केलं.