आईच्या मारेक-यांना पकडण्यासाठी 5 वर्षाच्या मुलीने पोलीसांना दिली लाच
By admin | Published: June 29, 2017 02:01 PM2017-06-29T14:01:59+5:302017-06-29T14:01:59+5:30
आईला आत्महत्येला भाग पाडणा-या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी एका पाचवर्षाच्या मुलीने तिची पीगी बँक पोलिसांसमोर ठेवली.
Next
ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 29 - आईला आत्महत्येला भाग पाडणा-या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी एका पाचवर्षाच्या मुलीने तिची पीगी बँक पोलिसांसमोर ठेवली. मेरठ पोलीस अधीक्षकांच्या ऑफीसमध्ये ह्दयहेलावून टाकणारी ही घटना घडली. माझ्या पीगी बँकमधले सर्व पैसे घ्या पण, माझ्या आईला आत्महत्येला ज्यांनी भाग पाडले त्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी या मुलीने केली.
तू तुझी पीगी बँक सोबत का आणली असे जेव्हा पोलिसांनी या मुलीला विचारले तेव्हा तिने अत्यंत निरागसपणे सध्याच्या जमान्यात पैशाशिवाय काही होत नाही असे उत्तर दिले. मानवी असे या मुलीचे नाव असून, ती आजोबा शांती स्वरुप शर्मा आणि काका रोहित शर्मा यांच्यासोबत आयजी राम कुमार यांची भेट घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आली होती.
आजोबा आणि काका अधीक्षकांच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर मानवीने सोबत आणलेली पीगी बँक बाहेर काढली आणि त्यांच्या टेबलावर ठेवली. पोलीस अधीक्षक राम कुमार यांनी मानवीला तिच्या आईच्या मारेक-यांना पकडण्याचे आश्वासन दिले व तिला तिची पीगी बँक परत घेऊन जाण्यास सांगितले.
मानवी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना तिच्या हातातून पीगी बँक निसटली व खाली पडली. पडलेली सुट्टी नाणी गोळा करताना तिला रडू कोसळले. त्यावेळी मानवीला तिच्या काकांनी नवीन पीगी बँक आणून देण्याचे आश्वासन दिले. मानवीची आई सीमाचा पाचवर्षांपूर्वी संजीव कौशिक यांच्याबरोबर विवाह झाला होता. त्यानंतर मानवीचा जन्म झाला.लग्नानंतर संजीवने सीमाचा हुंडयासाठी छळ सुरु केला. सीमा मागच्या चारवर्षांपासून आपल्या आई-वडीलांकडे राहत होती. सीमाने पती संजीव आणि सासू-सास-यांविरोधात कोर्टात खटलाही दाखल केला होता. पण त्यावर काही कारवाई झाली नाही.