क्रूरता; मुंबईतून बेपत्ता झालेल्या चिमुरडीचा मृतदेह गुजरातमध्ये सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 03:26 PM2018-03-27T15:26:46+5:302018-03-27T15:41:58+5:30
चिमुरडीचा गुजरातमधील नवसारी रेल्वे स्टेशनवर ट्रेनच्या स्वच्छतागृहात मृतदेह सापडला आहे.
मुंबई- नालासोपऱ्यातील घराजवळून एका पाच वर्षांच्या चिमुरडीचं शनिवारी अपहरण झालं होतं. या चिमुरडीचा गुजरातमधील नवसारी रेल्वे स्टेशनवर ट्रेनच्या स्वच्छतागृहात मृतदेह सापडला आहे. त्या चिमुरडीला गळा दाबून मारण्यात आल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे. अंजली सरोज असं मुलीचं नाव असून ती नालासोपाऱ्यातील साई अर्पण इमारतीत तिच्या कुटुंबासह राहत होती. पोलिसांनी इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सापडलेल्या अपहरणकर्त्यांच्या फुटेजवरून आरोपीचं रेखाचित्र जारी केलं आहे. शनिवारी संध्याकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एक महिला अंजलीला जबरदस्तीने ओढून घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आहे. रविवारी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी अपहरणकर्त्या महिलेचं रेखाचित्र केल्यानंतर रविवारी रात्री मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर समजाण आहे. प्राथमिक तपासात मुलीची हळा दाबून हत्या केल्याचं समोर येतं आहे. दरम्यान, आरोपी महिला नालासोपारा रेल्वे स्टेशनवर जवळपास एक-दीड तास होती. रेल्वे स्टेशनवरील काही किलोमीटर अंतरावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला एकटी जाताना दिसते आहे. आरोपी महिला त्याच भागातील राहणारी असू शकते व ती मुलीला आधीपासून ओळखत असावी, असं पोलीस अधिकारी जयंत बजबले यांनी सांगितलं आहे. आरोपीच्या रेखाचित्रावरून मुलीच्या वडिलांना आरोपीची ओळख पटलेली नाही.
शनिवारी संध्याकाळी अंजली जेव्हा इतर चार-पाच मुलांबरोबर बाहेर खेळत होती तेव्हा अपहरणकर्ती महिला इमारतीच्या बाजूला बसली होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. या महिलेने मुलांना चॉकलेट देऊन भुरळ घातली. त्यानंतर ती मुलंही महिलेशी बोलायला लागली. त्यानंतर आरोपी महिलेने अंजलीचा हात धरला व तिला घेऊन गेली. तिच्या मागे इतर मुलंही गेली. पण रस्ता क्रॉसिंगच्या वेळी महिलने मुलांना आणखी चॉकलेट आणायला पैसे दिले व अंजलीला घेऊन पुढे गेली.
रस्ता क्रॉसिंगजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपी महिला अंजलीचा हात धरून जाताना दिसते आहे. अपहरणकर्त्या महिलेला अंजलीलाच घेऊन जायचं होतं हे अंजलीसोबत असलेल्या इतर मुलांकडून समजतं आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. शनिवारी रात्री 8.45 च्या सुमारास अंजली घरी न परतल्याने तिच्या आई-वडिलांनी शोधायला सुरूवात केली. तेव्हा अंजलीला एक महिला घेऊन गेल्याचं तिच्यासोबत खेळत असलेल्या मुलांनी सांगितलं.
दरम्यान, पोलीस नालासोपारा ते नवसारीपर्यंतच्या रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. अपहरणकर्ती महिला अंजलीच्या कुटुंबाला ओळखत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.