गुजरातमधील प्रमुख पक्षांच्या ५० टक्के उमेदवारांकडे नाही पदवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 06:46 AM2019-04-09T06:46:57+5:302019-04-09T06:47:10+5:30
डॉक्टर, इंजिनीअर, उच्चशिक्षितही; पाचवीत शाळा सोडलेलाही निवडणुकीच्या आखाड्यात
अहमदाबाद : गुजरातमध्ये भाजप व कॉँग्रेसच्या ५२ पैकी २५ उमेदवारांकडे साधी पदवीही नाही. मात्र डॉक्टर, इंजिनीअर असे उच्चशिक्षित उमेदवारही रिंगणात आहेत. सुरेंद्रनगरमध्ये एका डॉक्टरची लढत पाचवीतच शाळा सोडलेल्या उमेदवाराशी होणार आहे.
गुजरातमधील २६ जागांसाठी येत्या २३ एप्रिलला मतदान होत आहे. भाजप, कॉँग्रेसच्या ५२ उमेदवारांपैकी निम्मे म्हणजे २५ उमेदवार पदवीधरही नाहीत. यात भाजपचे १४ तर कॉँग्रेसचे ११ उमेदवार आहेत. कॉँग्रेसचे चार तर भाजपच्या एकाने एसएससीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केलेले नाही.
भाजपचे किरीट सोळंकी (अहमदाबाद पश्चिम), के. सी. पटेल (बलसाड) तर कॉँग्रेसचे तुषार चौधरी (बार्डाेली) हे एम.बी.बी.एस. आहेत. पर्बत पटेल (बनासकांठा), भारतसिंह दाभी (पाटण) हे भाजपचे उमेदवार वकील आहेत. आणंद मतदारसंघातून लढणारे भाजपचे मितेश पटेल व कॉँग्रेसचे भारतसिंह सोळंकी हे इंजिनीअर आहेत. भाजपचे देऊसिंह चौहान (खेडा) व प्रभू वसावा (बार्डाेली) हे दोघेही इंजिनीअरच आहेत.
भावनगरच्या भाजप उमेदवार भारतीबेन सियाल या आयुर्वेदाच्या डॉक्टर (बीएएमएस) आहेत.