डिझेल आणि पेट्रोल खरेदीवर मिळतेय 50 टक्के कॅशबॅक, फक्त एकच अट...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 01:02 PM2017-12-12T13:02:08+5:302017-12-12T15:14:21+5:30
डिझेल आणि पेट्रोलवर 50 टक्के कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. ही ऑफर पेटीएम आणि हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून दिली जात आहे. या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर हिंदुस्तान पेट्रोलिअमच्या कोणत्याही पेट्रोल पंपाहून डिझेल किंवा पेट्रोलची खरेदी करावी लागणार आहे.
पाटणा - डिझेल आणि पेट्रोलवर 50 टक्के कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. ही ऑफर पेटीएम आणि हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून दिली जात आहे. या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर हिंदुस्तान पेट्रोलिअमच्या कोणत्याही पेट्रोल पंपाहून डिझेल किंवा पेट्रोलची खरेदी करावी लागणार आहे. तसंच पेमेंट करताना पेटीएमचा वापर करावा लागणार आहे. यासाठी एक अट आहे ती म्हणजे, पेमेंट क्यूआर कोड स्कॅन करुनच करावं लागेल, त्यानंतरच कॅशबॅक मिळेल. महत्वाचं म्हणजे, ही ऑफर फक्त बिहार राज्यापुरती आहे. फक्त बिहारमधील पेट्रोल पंपावरच या ऑफरचा फायदा घेतला जाऊ शकतो.
हिंदुस्तान पेट्रोलिअमच्या कोणत्याही पेट्रोल पंपावरुन इंधन खरेदी केल्यानंतर पुर्ण पेमेंट करावं लागेल. यानंतर बिहारमधील प्रत्येक हिंदुस्तान पेट्रोलिअमच्या पंपावर दर आठवड्याला तीन लकी विजेत्यांना कॅशबॅक दिली जाणार आहे. या ऑफरमध्ये सहभागी होणा-यांनी किमान 300 रुपयांचं इंधन खरेदी करण्याची अट आहे. लकी ड्रॉमध्ये नाव येणा-या विजेत्यांच्या पेटीएम वॉलेटमध्ये 150 रुपयांचं कॅशबॅक क्रेडिट केलं जाईल.
याशिवाय बिहारमध्ये हिंदुस्तान पेट्रोलिअमच्या प्रत्येक पंपावर डिझेल आणि पेट्रोल खरेदी करणा-यांना पाच टक्के कॅशबॅक दिलं जात आहे. ग्राहक दोनवेळा याचा फायदा उचलू शकतात. डिझेल आणि पेट्रोलची खरेदी केल्यानंतर पेटीएमने पेमेंट करणा-यांनी पाच टक्के कॅशबॅक दिली जाईल. याशिवाय ग्राहकाला किमान 20 रुपयांचा व्यवहार करावा लागेल. जास्तीत जास्त 50 रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. 28 डिसेंबर 2017 पर्यंत ही ऑफर सुरु असणार आहे.
सध्या पेटीएमवर 12-12 फेस्टिव्हल सुरु आहे. पेटीएमने युजर्सना वेगवेगळ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट दिले आहेत. पिझ्झा हटमध्ये 30 टक्के कॅशबॅक, बिग बाजारमध्ये 1500 रुपयांच्या खरेदीवर 200 रुपयांचा कॅशबॅक, पँटलून्समध्ये खरेदी केल्यानंतर पेटीएमने पेमेंट केल्यास 50 टक्के कॅशबॅक दिली जात असून, याशिवाय कुठेही क्यूआर कोड स्कॅन करुन पेमेंट केल्यास 12 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.