२०२० पर्यंत देश गाठणार ५० कोटी 'मेक इन इंडिया' मोबाइलचा टप्पा; अजय कुमार यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 02:37 PM2017-09-14T14:37:04+5:302017-09-14T14:42:02+5:30
भारतीय बनावटीचे मोबाइल फोन्सचे उत्पादन सध्या जोरात सुरु असून २०१९-२० या वर्षापर्यंत या फोन्सची संख्यी २० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली, दि. १४- भारतीय बनावटीचे मोबाइल फोन्सचे उत्पादन सध्या जोरात सुरु असून २०१९-२० या वर्षापर्यंत या फोन्सची संख्यी २० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. २०१४ साली आपण ६ कोटी मोबाइल फोन्सची निर्मिती केली, २०१६-१७ साली ती संख्या १७.५ कोटींवर गेली तर २०१९-२० साली ५० कोटी मेक इन इंडिया मोबाइल फोन्स बनवले जातील,अशी माहिती माहिती तंत्रज्ञान खात्याचे अतिरिक्त सचिव अजय कुमार यांनी दिली आहे. इएलसीआयएनएच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. या फोनच्या व्हॅल्यू अॅडिशनच्या प्रमाणातही लक्षणीय प्रगती होत असल्याचे कुमार म्हणाले. पुर्वी हे प्रमाण १०% होते. आता ते २०% असून यापुढच्या काळात ते ३५% टक्क्यांवर जाणार असल्याची माहिती कुमार यांनी दिली.
अजय कुमार यांच्याप्रमाणेच इलेक्ट्राँनिक क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचे कौतुक केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही केले. कोणतेही उत्पादन हे मेक इन इंडिया असावे, यावर भर दिला पाहिजे असे रिजिजू म्हणाले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही परस्पर सामंजस्य कराराच्या मदतीने करुन भारतातच उत्पादने बनवू शकता. भारताच्या हिताला आपण पहिले प्राधान्य दिले पाहिजे, म्हणूनच मी मेक इन इंडियावर नेहमी भर देतो. एखाद्या उत्पादनाच्या बाबतीत आपण सर्वोत्तम गुणवत्ता व परिपूर्ण बनू शकतो. मात्र दीर्घ कालाचा विचार करता ते उत्पादन मेड इन इंडिया असले पाहिजे हे आपण लक्षात ठेवावे असे रिजिजू यांनी उपस्थितांना सांगितले.
संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी तसेच नवे संशोधन नवे विचार घेऊन उद्योगांनी पुढे यावे असे आवाहनही रिजिजू यांनी केले. 'मला तुमची याबाबत मते हवी आहेत, तुमच्या सुचना हव्या आहेत. तुम्ही उद्योगांनी नव्या सूचनांसह पुढे आलं पाहिजे. सरकारला तुम्ही योग्य धोरण आखण्यासाठी तुम्ही सूचना कराव्यात म्हणजे अशा धोरणाच्या आधारावर आपण भारताला उत्पादनाचे मोठे केंद्र बनवू शकू ' असे रिजिजू यांनी उद्योजकांना आवाहन केले.