लसीकरण केलेल्यांना 50 % डिस्काऊंट, पब अन् बार मालकाची भन्नाट ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 09:11 AM2021-06-20T09:11:47+5:302021-06-20T09:13:02+5:30
राजधानी दिल्लीतील सायबर सिटी असलेल्या गुरुग्राममध्ये एका पब आणि बार मालकाने कोविडची दुसरी लाट ओसरताच भन्नाट ऑफर सुरू केली आहे
नवी दिल्ली - देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहीत करण्यात येत आहे. त्यासाठी, राज्य सरकारला लसींचा पुरवठा करणे आणि लवकरात लवकर लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी, खासगी केंद्रातही लसीकरण सुरू झाले आहे. आता, त्यावरुनच दुकाने उघडल्यानंतर व्यापाऱ्यांकडून भन्नाट ऑफर देण्यात येत आहे. दिल्लीतील एका रेस्टॉरंट मालकाने चक्क 50 टक्के डिस्काऊंट देऊ केला आहे.
राजधानी दिल्लीतील सायबर सिटी असलेल्या गुरुग्राममध्ये एका पब आणि बार मालकाने कोविडची दुसरी लाट ओसरताच भन्नाट ऑफर सुरू केली आहे. ज्या नागरिकांनी, ग्राहकांनी लसीकरण पू्र्ण केले आहे, म्हणजेच कोरोनावरील लशींचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना बिलामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तर, ज्या ग्राहकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना बिलात 25 टक्के सूट देण्यात येईल. कोरोना कालवधीनंतर ग्राहकांना आकर्षित करुन केवळ व्यवसाय वाढीसाठी ही ऑफर नसून, ग्राहकांची सुरक्षितता आणि काळजी याही जमेच्या बाजू आहेत, असे येथील रेस्टॉरंटचे मालक युधवीरसिंग यांनी म्हटलं आहे.
कोरोनामुळे देशात पहिल्यांदाच लॉकडाऊनचं संकट उभं राहिलं होत. पहिल्या लाटेनंतर अनलॉक सुरू झालं, पण दुसऱ्या लाटेनं पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना देशातील जनतेला करावा लागला. या लॉकडाऊनमध्ये देशातील व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जवळपास गेल्या 1 वर्षांपेक्षा अधिक काळापासून व्यापाऱ्यांच्या दुकानात बंद-सुरूचा खेळ सुरु आहे. त्यामुळे व्यापारी त्रस्त आहेत. त्यामुळेच, आता दुकाने, हॉटेल्स उघडल्यानंतर व्यापाऱ्यांकडून भन्नाट ऑफर देण्यात येत आहेत. गुरुग्राममधील बार मालकानेही अशीच ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित केलं आहे. तसेच, लसीकरणाबद्दल जागृतीही केली आहे.