उत्तर प्रदेशातील ५० जिल्हे भूकंपप्रवण; धोक्याची घंटा
By Admin | Published: May 1, 2015 01:58 AM2015-05-01T01:58:04+5:302015-05-01T01:58:04+5:30
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाने सीमेवरील उत्तर प्रदेशलाही धोक्याचा इशारा दिला आहे. या राज्यातील एकूण ७५ जिल्ह्णांपैकी ५० जिल्हे भूकंपप्रवण आहेत.
लखनौ : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाने सीमेवरील उत्तर प्रदेशलाही धोक्याचा इशारा दिला आहे. या राज्यातील एकूण ७५ जिल्ह्णांपैकी ५० जिल्हे भूकंपप्रवण आहेत.
गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने (एनआयडीएम) झोन ४ अंतर्गत भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या २९ जिल्ह्णांची यादी तयार केली आहे. संस्थेने राज्याचे तीन क्षेत्रात विभाजन केले आहे. नेपाळ आणि उत्तराखंडमधील उत्तरकाशीला लागून असलेल्या भागाचा समावेश झोन-४ मध्ये करण्यात आला आहे.
नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता बघितल्यानंतर उत्तर प्रदेश भूकंपापासून किती सुरक्षित आहे, याचा नव्याने विचार करण्याची गरज शास्त्रज्ञांना वाटली. कारण या भूकंपाचे धक्के उत्तर प्रदेशालाही बसले होते. नेपाळमधील भूकंपानंतर बाराबंकी, कुशीनगर, संत कबीरनगर, बदायू, श्रावस्ती, बलिया आणि गोरखपूर जिल्ह्णात अनेक हादरे बसले.
‘उत्तर प्रदेशातील वाढत्या शहरीकरणामुळे भविष्यात फार मोठी जीवहानी होऊ शकते. यावेळी नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाचे धक्के सुदैवाने राज्यात तेवढ्या तीव्रतेने जाणवले नाहीत. परंतु राज्यात नियमांचे पालन होत नाही. उंच इमारती भूकंपरोधी असणे अत्यावश्यक आहे’, अशी माहिती भूकंप विशेषज्ञ आणि भारतीय भूसर्वेक्षण विभागाचे माजी संचालक व्ही.के. जोशी यांनी दिली.
उत्तर प्रदेशात ८० वर्षात प्रथमच अशाप्रकारचे धक्के अनुभवण्यास आले. उत्तर आणि पश्चिम भागात अधिक तीव्रतेच्या भूकंपाचा परिणाम जास्त जाणवतो.
नेपाळ: मदतीचा ओघ सुरूच
भारतातर्फे नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच असून गुरुवारी ८,४५० तंबू नेपाळला पाठविण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार विविध निमलष्करी दलांकडून हे तंबू घेण्यात आले आहेत. यापैकी ७५० तंबू विमानाने पाठविण्यात आले. भूकंपात घरे उद्ध्वस्त झालेल्या लोकांना या तंबूंचे वाटप केले जाईल.
‘भूकंपग्रस्त नेपाळच्या गरजेनुसार आम्ही सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. भारतीय वायुसेनेलासुद्धा त्यांच्या मागणीनुसार मदत करण्यास सांगण्यात आले आहे आणि मदत मोहिमेचा वेगही त्या देशाच्या इच्छेवर अवलंबून असेल.’
मनोहर पर्रीकर
संरक्षण मंत्री
४पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून भारतात नुकत्याच आलेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला. मोदी यांनी टिष्ट्वट करून ही माहिती दिली. शरीफ यांनी नेपाळमधील बचाव कार्यात भारताद्वारे करण्यात येत असलेल्या मदतीचीही प्रशंसा केली. सार्क देशांनी आपत्तीतील बचाव व मदतीवर नियमित संयुक्त सराव केला पाहिजे,अशी सूचना शरीफ यांनी केली.