अभिमानास्पद! ७५ उंबऱ्याच्या गावात ५० आयएएस, आयपीएस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 09:26 AM2021-07-20T09:26:09+5:302021-07-20T09:27:39+5:30
गावात जवळपास प्रत्येक घरात नागरी सेवेत एक जण असला तरी गावाची परिस्थिती सुधारलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अधिकारी इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशमधून सर्वात जास्त असतात. दरवर्षी एक हजारपेक्षा कमी रिक्त जागांसाठी जवळपास १० लाख उमेदवार ही यूपीएससी ही अवघड परीक्षा देतात. उत्तर प्रदेशमध्ये माधोपट्टी (जिल्हा जौनपूर) हे लहानसे गाव. त्याची ओळख आयएएस आणि आयपीएस गाव अशीच आहे.
माधोपट्टी गावात ७५ घरे असून जवळपास प्रत्येक घरात आयएएस किंवा आयपीएस केडरचा एक सदस्य आहे. या गावात एकूण घरे ७५ पण येथे अधिकाऱ्यांची संख्या ५० पेक्षा जास्त. या गावातील मुले व मुलीच नाही तर सुनादेखील अधिकाऱ्याचे पद सांभाळत आहेत. माधोपट्टी गावाची तुलना गाजीपूरच्या गहमर गावाशी केली जाऊ शकते. माधोपट्टी गावात अनेक लोकांनी नागरी सेवांमध्ये आपले करिअर केले. गावातील काही युवकांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि भाभा अणुशक्ती केंद्रातही यशस्वी करिअर केले आहे. या गावात चार भावांची निवड आयएएससाठी झाल्याचा विक्रमही आहे.
परंपरा...
- १९५५ मध्ये नागरी सेवा उत्तीर्ण केलेले विनय कुमार सिंह हे बिहारचे मुख्य सचिव म्हणून सेवानिवृत्त झाले.
- विनय कुमार सिंह यांचे दोन भाऊ छत्रपाल सिंह आणि अजय कुमार सिंह यांनी १९६४ मध्ये ही परीक्षा उत्तीर्ण केली.
- चौथे बंधू शशिकांत सिंह १९६८ मध्ये आयएएस बनले. छत्रपाल सिंह तमिळनाडूचे मुख्य सचिव होते.
- माधोपट्टी गावात जवळपास प्रत्येक घरात नागरी सेवेत एक जण असला तरी गावाची परिस्थिती सुधारलेली नाही. गावात रस्त्यांवर खड्डे आहेत.