साखरपुडा झाला, मंडप सजला पण नवरदेव आलाच नाही; कारण दुसऱ्या पक्षाने 50 लाख हुंडा दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 11:37 AM2023-05-15T11:37:30+5:302023-05-15T11:48:00+5:30
नवरदेवाच्या अचानक अशा वागण्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे, मात्र लग्न न झाल्याची विचित्र घटना गोरखपूरमध्ये समोर आली आहे. दुसऱ्या पक्षाकडून हुंड्यात कितीतरी पटीने जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाने पहिले लग्न मोडलं. 10 मे रोजी हे लग्न होणार होतं. मुलीच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. सगळे नातेवाईक जमले होते.याच दरम्यान, नवरदेवाच्या अचानक अशा वागण्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गोरखनाथ परिसरातील आहे. यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसांकडे मदतीचे आवाहन केले आहे. गोरखनाथ परिसरातील विकास नगर, बरगडवा येथील एका मुलीचे लग्न चिलुआताल भागातील राप्तीनगर येथील अरुण उपाध्याय यांचा मुलगा प्रशांत उपाध्याय याच्यासोबत निश्चित झाले होते. साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर 10 मे रोजी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. मात्र शेवटच्या क्षणी मुलांनी लग्नास नकार दिला.
पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, मुलांनी हुंड्याची रक्कम घेतली आणि गाडीची रक्कमही घेतली. पण, दुसऱ्या पक्षाकडून 50 लाख हुंड्याची ऑफर आल्याने त्यांनी दुसऱ्या ठिकाणी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलीने तिच्या माहेरच्या नातेवाईकांसह मुलाच्या घरी पोहोचून लग्न न करण्याचे कारण विचारले. त्यावर त्याला अन्य पक्षाकडून एकूण 50 लाखांचा हुंडा मिळत असल्याचे सांगण्यात आले.
जास्त हुंडा मिळत असल्याने ते लग्न करू शकत नाहीत. यानंतर मुलीच्या घरच्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांच्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी तरुण प्रशांत उपाध्याय, त्याचे वडील अरुण उपाध्याय आणि आई नलिनी उपाध्याय यांच्याविरुद्ध चिलुआतल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक जयंत कुमार सिंह यांनी सांगितले की, चिलुआतल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.