५० टक्के भारतीय करतात स्वत:च उपचार
By admin | Published: April 9, 2015 12:46 AM2015-04-09T00:46:26+5:302015-04-09T00:46:26+5:30
स्वत:ची औषधे स्वत:च निवडणे ही अत्यंत धोकादायक सवय असून, भारतातील ५२ टक्के लोक स्वत:च अशी औषधांची निवड करतात असा यासंदर्भातील अभ्यासाचा निष्कर्ष आहे.
नवी दिल्ली : स्वत:ची औषधे स्वत:च निवडणे ही अत्यंत धोकादायक सवय असून, भारतातील ५२ टक्के लोक स्वत:च अशी औषधांची निवड करतात असा यासंदर्भातील अभ्यासाचा निष्कर्ष आहे.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉक्टरांनी केलेल्या रुग्णांच्या अभ्यासात ही बाब उघडकीस आली आहे. लिब्रेट नावाच्या व्यासपीठाअंतर्गत मार्च महिन्यापासून देशातील १० शहरांत हा अभ्यास करण्यात आला असून २० हजार नागरिकांच्या सवयी पाहून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
आरोग्य सेवा सरसंचालक जगदीश प्रसाद यासंदर्भात बोलताना म्हणाले की, दैनंदिन जीवनात अनेक भारतीय स्वत:च्या आजारावर स्वत:च औषधे घेतात. पण ही सवय आरोग्याची मोठी समस्या निर्माण करू शकते, त्यामुळे ती बंद केली पाहिजे. भारतात प्रत्येकजण स्वत:ला आरोग्य तज्ज्ञ समजतो. स्थानिक औषध दुकानदार ते बसमध्ये बरोबर प्रवास करणारा सहप्रवासी तुम्हाला विविध आजारावरील औषधाबाबत सल्ला देतो. वरवर पाहता ही औषधे फारशी धोकादायक नसतात, पण नंतर कधीतरी त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात.
अँटीबायोटिक औषधांचा पूर्ण कोर्स न घेण्याची पद्धतही यातच मोडते. यामुळे अँटीबायोटिक औषधांना प्रतिकारक क्षमता शरीरात तयार होते. स्वत:च उपचार करण्यात हाही एक धोका आहेच. आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने अशा कुप्रथा सुरू होतात, देशात ८ लाख आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांची सेवा योग्य त्या पद्धतीने वापरली जात नाही, असे या सर्वेक्षणातून दिसून आले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)